
समाजात संवेदनशीलतेने वागा : हरिश्चंद्र गीते
सर्वोदय छात्रालयात छात्र-मित्र मेळाव्याला प्रतिसाद
रत्नागिरी : “सर्वोदय छात्रालय आणि शाळेत शिक्षक म्हणून काम करताना मला विद्यार्थ्यांकडून संवेदनशीलता शिकायला मिळाली. आपणही दुसऱ्या माणसाचे मन ओळखायला शिकले पाहिजे. मनाला जपले, अवमान होणार नाही, असे वागले तर समोरचा माणूसही प्रेम करतो. ही संवेदनशीलता सर्वांमध्ये यावी,” असे प्रतिपादन श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्टचे माजी अध्यक्ष हरिश्चंद्र गीते यांनी केले.
श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्ट संचलित सर्वोदय छात्रालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या छात्र मित्र मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर सर्वोदय छात्र समितीचे अध्यक्ष अरुण जाधव, ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. संदीप ढवळ, व्यवस्था समितीचे अध्यक्ष गजानन चाळके, विश्वस्त पांडुरंग पेठे, विश्वस्त बाळकृष्ण शेलार आदी उपस्थित होते.
या वेळी अरुण जाधव म्हणाल, “छात्र मित्र मेळावा म्हणजे सर्व माजी छात्रांना एकत्र आणण्याचे व्यासपीठ आहे. वेगवेगळ्या ठिकाणी असणारे छात्र एकत्र येऊन छात्रालयाला मदत करू शकतात. त्यासाठी हा मेळावा उपयुक्त ठरतो. तसेच आपले सर्वांचे गीते सर यांचे मार्गदर्शन ऐकण्याची संधी मिळते. त्यांच्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा मिळाली आहे. त्यांच्याबद्दलचे कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे.”
ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. ढवळ म्हणाले, “मी छात्रालयाचा माजी विद्यार्थी असून येथील माजी विद्यार्थीच ट्रस्टमध्ये कार्यरत आहेत. यामुळे चांगल्या रितीने काम सुरू आहे. ट्रस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी व समाजासाठी नवनवीन प्रकल्प राबवण्याचा ट्रस्टचा विचार आहे.”
या कार्यक्रमावेळी उपस्थित सर्व माजी छात्रांनी आपापली ओळख करून दिली. तसेच छात्रालयात राहायला मिळाल्यामुळे आणि गीते सर यांच्या मार्गदर्शनामुळे आयुष्याला शिस्त लागलल्याचे सांगितले.
सौ. बीना कळंबटे यांनी सूत्रसंचालन केले. विश्वस्त पांडुरंग पेठे यांनी सर्वोदय छात्रालयाशी निगडीत आठवणी सांगितल्या व आभार मानले.




