
लाईक,शेअर आणि सबसक्राईबच्या मागे न लागता अधिकारी बनण्याची ज्योत मनात पेटवाअपर पोलीस अधीक्षकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
शोभना कांबळे पत्रकार सन्मान,नंदकुमार सुर्वे छायाचित्रकार सन्मान पुरस्काराने सन्मानित

रत्नागिरी दि.६ प्रतिनिधी
राज्यात आम्ही विविध जिल्ह्यात काम करतो तेव्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये रत्नागिरीचा टक्का खूप कमी दिसतो.हे चित्र आपल्याला बदलायला हवे.
लाईक शेअर आणि सबक्राईबच्या मागे न लागता
तुमच्या मनात एक ज्योत पेटवा की मला प्रशासनात जाऊन काम करायचे आहे.त्यादृष्टीने प्रयत्न सुरू करा निश्चितच तुम्ही प्रशासकीय अधिकारी बनून जनतेची सेवा कराल असे उद्गार अपर जिल्हा पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी यांनी काढले.ते आज पत्रकार दिनी द पॉवर ऑफ मिडिया फाउंडेशन यासंस्थेने मराठा मंदिर अ.के.देसाई हायस्कूल येथे आयोजित केलेल्या स्पर्धा परीक्षा म्हणजे काय? या विषयावरील व्याख्यानात बोलत होते.यावेळी दैनिक लोकमतच्या
ज्येष्ठ महिला पत्रकार शोभना कांबळे यांना पत्रकार सन्मान आणि लांजा येथील नंदकुमार सुर्वे यांना वृत्तपत्र छायाचित्रकार सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले.
पुढे बोलताना अपर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी म्हणाले की, स्वातंत्र्य संग्रामात वर्तमानपत्रांचे योगदान महत्वाचे होते.पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे.पत्रकार चांगल्या गोष्टींचे कौतुक आणि चुकीचे काम केले तर आरसा दाखवतात असे महामुनी म्हणाले.लहानपणापासून स्पर्धा सुरू होते.आयुष्यात प्रत्येक पातळीवर स्पर्धा करावी लागते.आज मुलांना डॉक्टर आणि इंजिनियर व्हायचे असते पण प्रशासकीय सेवेकडे जायचा कल दिसत नाही.स्पर्धा परीक्षेतून तुम्ही जिल्हाधिकारी पदापर्यंत पोहचू शकता.मी स्वता स्पर्धा परीक्षा द्यायला सुरुवात केली तेव्हा सुरूवातीला पीएसआय नंतर भूमी अभिलेख मध्ये निवड झाली.त्यानंतर तहसीलदार म्हणून निवड झाली आणि नंतर उपविभागीय अधिकारी म्हणून निवड झाली होती.आज तुम्ही लाईक शेअर आणि सबक्राईबच्या मागे लागू नका त्यापेक्षा प्रशासकीय अधिकारी होण्याची ज्योत मनात पेटवा मग प्रसिध्दी तुमच्या मागून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी सांगितले की, यावयातच तुम्ही स्पर्धा परीक्षा देण्याची खूणगाठ मनाशी बांधा.उद्या तुमच्यातील विद्यार्थी अधिकारी बनून व्यासपीठावर बसलेले दिसतील.म्हणून आतापासूनच कष्ट करा असा सल्ला देताना सातपुते यांनी विद्यार्थ्यांना कथा सांगून प्रबोधन केले.शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली पिलणकर यांनी पॉवर ऑफ मिडिया फाउंडेशन आणि उपस्थित अधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांना केलेल्या मार्गदर्शनाबद्दल आभार मानले.यावेळी पत्रकार सन्मान पुरस्कार प्राप्त शोभना कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी पॉवर ऑफ मिडिया फाऊंडेशनचे अध्यक्ष दुर्गेश आखाडे,उपाध्यक्ष सचिन सावंत,खजिनदार नीलेश आखाडे.ज्येष्ठ पत्रकार राजेश मयेकर,सदस्य नरेश पांचाळ आणि सचिन मिरगुले उपस्थित होते.




