
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा रत्नागिरी जिल्हा मेळावा उत्साहात
मुख्याध्यापक व शिक्षकांचा गौरव
गुहागर : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद रत्नागिरी व गुहागर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय वार्षिक मेळावा गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळेच्या श्री शिवछत्रपती सभागृहात नुकताच उत्साहात झाला. जिल्हा मेळाव्यात जिल्ह्यामधील गुणवंत मुख्याध्यापक व शिक्षक यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
हा मेळावा गुहागरचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमापूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रारंभी माजी कोकण पदवीधर आमदार अशोक मोडक, शिक्षक परिषद संस्थापक अध्यक्ष वसंतराव काणे, उल्हास फडके, रत्नागिरीचे माजी शिक्षणाधिकारी प्रकाश परब, कामगार नेते बाबा आढाव व इतर सामाजिक चळवळीमध्ये असणाऱ्या व नुकतेच निधन झालेल्या मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
न्यू इंग्लिश स्कूल पाटपन्हाळे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले. राज्य कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, कोकण विभाग अध्यक्ष गुलाबराव पाटील, राज्य कार्यवाह लक्ष्मण वालगुडे, राज्य उपाध्यक्षा हेमलता मुनोत, कोकण विभागाचे माजी अध्यक्ष रवींद्र इनामदार, कोकण विभाग सहकार्यवाह सुनील गौड, कोकण विभाग कोषाध्यक्ष प्रकाश पाटील, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष किरण देशपांडे, जिल्हा कार्यवाह पांडुरंग पाचकुडे, जिल्हा सहकार्यवाह विनायक जाधव, जिल्हा संघटक गणेश कुलकर्णी, जिल्हा कोषाध्यक्ष राजन नाईक, जिल्हा महिला संघटक काजल राऊत, जिल्हा उपाध्यक्ष व चिपळूण तालुकाध्यक्ष जीवन पाटील, दामिनी भिंगार्डे, रत्नागिरी तालुका अध्यक्ष राजेश आयरे, राजापूर तालुका अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, मंडणगड तालुका अध्यक्ष अमित रसाळ, खेड तालुका अध्यक्ष विजय मस्के, संगमेश्वर तालुका अध्यक्ष भरत धनपाल, दापोली तालुका अध्यक्ष संदीप गोरीवले, गुहागर तालुका अध्यक्ष सुमंत भिडे, जिल्हा कार्यकारणी सदस्य व तालुका कार्यकारणी सदस्य तसेच संघटनेचे माजी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाध्यक्ष, विशेष अतिथी व मान्यवर यांचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद रत्नागिरी जिल्ह्यामधील गुणवंत मुख्याध्यापक व शिक्षक यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कमलाकर हरी कांबळे (भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यामंदिर, अंबडवे – मंडणगड), रवींद्र विक्रमराव बांगर (हुतात्मा बबनराव भोईटे विद्यामंदिर कुंबळे,मंडणगड), शैलेश वसंत कोंडविलकर (एम. के. इंग्लिश स्कूल आंजर्ले, दापोली), सेजल सचिन भाटकर (लोकमान्य हायस्कूल दापोली), विजय तातोबा बसवंत (कविता सराफ माध्यमिक विद्यालय लोटे परशुराम – खेड), राकेश रमेश देवरुखकर (श्रीमान चंदूलाल शेठ हायस्कूल व ज्यु. कॉलेज, खेड), श्रीधर रघुनाथ जोशी (न्यू इंग्लिश स्कूल तिवरे (चिपळूण), आशा उत्तम नलवडे (मिलिंद हायस्कूल व ज्यु. कॉलेज रामपूर, चिपळूण), अनंतकुमार केशव मोघे (न्यू इंग्लिश स्कूल व गुरुवर्य काकासाहेब सप्रे विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय देवरुख- संगमेश्वर), प्रकाश शिवाजी दळवी (पैसाफंड हायस्कूल, संगमेश्वर), शुभदा सुनील माने (रा. मी. बेर्डे विद्यालय, सापुचेतळे, लांजा), प्रशांत मच्छिन्द्र अंबवडे (न्यू इंग्लिश स्कूल अँड तू. प. शेट्ये ज्यु. कॉलेज लांजा), दिनकर शंकर बुवा (आचार्य नरेंद्रदेव विद्यामंदिर भू), दर्शना दत्तात्रय मांडवकर (राजापूर हायस्कूल), सानिका नितीन पंडित (जी. एम. शेट्ये हायस्कूल बसणी, रत्नागिरी), दिगंबर भागोजी किंजळे (माध्यमिक विद्यामंदिर व ज्यु. कॉलेज नाणीज), अनंत हणमंत साठे (सिद्धिविनायक विद्यामंदिर, मुंढर, गुहागर), मनिषा अनिल सावंत (श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर, गुहागर) या गुणवंत मुख्याध्यापक व शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
मार्गदर्शन सत्रात १ नोव्हेंबर २००५ पूर्वीची नियुक्ती, विना अनुदानित टप्पा, अनुदानितमध्ये असलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची जुनी पेन्शन याबाबत राज्याचे कोषाध्यक्ष व जुनी पेन्शन संघर्ष समिती प्रमुख राजेंद्र सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले.
राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू यांनी १५ मार्च २०२४ चा जाचक शासन निर्णय, टीईटी सक्ती, एनइपी २०२० प्रभावी अंमलबजावणी , शिक्षण अधिष्ठान विधेयक २०२५, संस्थाचालक – मुख्याध्यापक – शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध समस्या, शिक्षक परिषद संघटनेने केलेले काम व भविष्यातील वाटचाल याबाबत मार्गदर्शन केले. माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे यांनी शिक्षण वाचवा, शासनाचे सध्याचे शैक्षणिक धोरण व भविष्यातील शिक्षणाबाबतचे धोके आदी विषयांबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाध्यक्ष माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी कौशल्य आधारित शिक्षणाची गरज व उपयुक्तता, व्यवसायिक शिक्षणाची गरज, रोजगार निर्मिती आदीबाबत मार्गदर्शन केले.
चर्चा सत्रात राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू व राज्य कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी यांनी उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद रत्नागिरी जिल्हा मेळाव्यासाठी बहुसंख्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे व सूत्रसंचालन जिल्हा संघटक गणेश कुलकर्णी यांनी केले. गुहागर तालुका अध्यक्ष सुमंत भिडे यांनी आभार मानले.




