
देवगड–जामसंडे शहराच्या विकासाला मिळणार गतीपालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण संपन्न
सिंधुदुर्गनगरी दिनांक 5 ):- देवगड–जामसंडे नगरपंचायती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध महत्त्वपूर्ण विकासकामांचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री तथा बंदर विकास व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. देवगड–जामसंडे नगरपंचायतीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या विकासकामांमध्ये कुडाळवाडी, देवगड व वैभववाडी येथील शहरी भागांमधील पर्यटन स्थळांवर ई-टॉयलेटची उभारणी, निर्मिती पीपल्स अँड अॅनिमल वेल्फेअर सोसायटी, सुनिधी आश्रय फाउंडेशन यांच्या माध्यमातून भटक्या श्वानांचे निर्बंधीकरण व अँटी-रेबीज लसीकरण मोहीम, तसेच नगरपंचायत क्षेत्रातील घनकचरा संकलन व वाहतुकीसाठी वाहन व ट्रॅक्टर-ट्रॉलीची खरेदी यांचा समावेश आहे.
या लोकार्पण सोहळ्याला माजी आमदार अजित गोगटे, उपविभागीय अधिकारी जगदीश काटकर, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गौरी पाटील ,स्वच्छता सभापती बुवा तारी, बांधकाम सभापती रोहन खेडेकर, पाणीपुरवठा सभापती तनवी चांदोस्कर, तसेच सर्व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, देवगड–जामसंडे नगरपंचायत सुंदर, स्वच्छ आणि आदर्श शहर बनवण्यासाठी शासनाकडून आवश्यक ती सर्व मदत सातत्याने दिली जाईल.
स्वच्छता, नागरी सुविधा आणि पर्यटन विकासाच्या दृष्टीने हे प्रकल्प नागरिकांसाठी लाभदायक ठरणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
०००००




