
संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव येथे एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांकडून ७ लाख ६२ हजार ७०० रुपयांचा ऐवज लंपास
संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव येथील केतकर गल्लीत एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ७ लाख ६२ हजार ७०० रुपयांचा ऐवजी लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत सुबोध मोरेश्वर जोगळेकर (वय ५३, रा.कोंडगाव, सध्या रा. पुणे) यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही चोरी ३१ डिसेंबर २०२५ ते ३ जानेवारी २०२६ या दरम्यानच्या काळात झाली आहे.
फिर्यादी जोगळेकर हे कामानिमित्त पुण्यात असताना, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या कोंडगाव येथील घराच्या मागील दरवाजावर शस्त्राने प्रहार करून आतील कडी तोडली आणि घरात प्रवेश केला. चोरट्यांनी बेडरुममधील कपाटाचे लॉकर तोडून ५ लाख रुपयांची रोख रक्कम, ७५ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी, १ लाख रुपये किमतीची सोन्याची चैन आणि २० हजार रुपयांचे चांदीचे गोळे असा मौल्यवान ऐवज चोरला.
केवळ दागिने आणि रोख रक्कमच नव्हे, तर चोरट्यांनी घरातील मोठ्या प्रमाणावर तांब्या-पितळेची भांडी, स्टीलची भांडी, गॅस शेगडी, सिलिंडर आणि शिलाई मशीनचे सुटे भागही चोरून नेले आहेत. याशिवाय संगणक साहित्य, प्रिंटर, इन्व्हर्टर, बॅटरी आणि चार हार्ड डिस्क असा एकूण ७ लाख ६२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.




