
विशेष लेख -आत्मनिर्भर भारत : निसर्ग आणि तंत्रज्ञानाचा मेळ घालत
रत्नागिरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेचा मूळ आधार ‘व्होकल फॉर लोकल’ हा आहे. रत्नागिरी जिल्ह्याने आपल्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या जोरावर कृषी, मत्स्यव्यवसाय आणि पर्यटन क्षेत्रात क्रांती घडवून या मोहिमेत स्वतःचे स्थान अधोरेखित केले आहे. सन 2023-24 नुसार जिल्ह्याचे दरडोई निव्वळ उत्पन्न 1 लाख 42 हजार 032 कोटी रुपये इतके आहे. राज्याच्या निव्वळ उत्पन्नाशी 1.18 इतकी टक्के आहे.
एक जिल्हा एक उत्पादनात रत्नागिरी अव्वल हापूस आंब्याला सुवर्णपदकाचा मान
रत्नागिरीचा हापूस (Alphonso) हा केवळ फळांचा राजा नाही, तर तो जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आंब्याबरोबरच काजू, नारळ, कोकम आणि मासे ही जिल्ह्याची उत्पादने आहेत. 2018 साली हापूस आंब्याला जीआय टॅग मिळाला आहे. राज्यामध्ये 162.08 हजार हेक्टर क्षेत्रामध्ये आंबा क्षेत्र आहे. त्यातून 463.17 हजार टन आंबा उत्पादन होते. हेच प्रमाण कोकण विभागात 126.41 हजार हेक्टर लागवड क्षेत्रामध्ये 213.37 हजार टन आंबा उत्पादन होतो. तर एकट्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आंबा फळपीक 68 हजार 550 हेक्टर क्षेत्रामध्ये लागवड होते. उत्पादन 184602 इतके असून त्याची उत्पादकता 3 टन आहे. काजू फळपीकाच्या बाबतीत पुढीलप्रमाणे लागवड आहे. क्षेत्र- 112557, उत्पादन- 142020, उत्पादकता-1.5 टन आहे.
मागील तीन वर्षात जिल्ह्यात झालेली फळबाग लागवड –
आंबा –
2023-24 391.43ha
2024-25 406.72ha
2025-26 447.60ha
1 लाख 84 हजार 602 मे. टन आंबा उत्पादन घेवून, रत्नागिरी प्रथम क्रमांकावर राहिला आहे. ‘अपेडा’ (APEDA) च्या सहकार्याने शेतकऱ्यांना थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून दिले जात आहे.
2022-23 आणि 2023-24 वर्षासाठी रत्नागिरी जिल्ह्यामधून आंबा निर्यात करुन अनुक्रमे 145.98 लाख व 250.86 लाख इतके उत्पन्न मिळाले आहे. हापूस आंब्याची सर्वाधिक आयात करणारे देश कुवेत, संयुक्त अरब अमिराती, युनायटेड किंग्डम, कतार, ओमान, युनायटेड स्टेटस ऑफ अमेरिका, बहरिन आणि कॅनडा आहेत. यासाठी पालकमंत्री आणि उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्यासह अधिकारी वर्ग आणि शेतकरी वर्गाचे योगदान नेहमीच राहीले आहे.
प्रक्रिया उद्योग: आंब्याचा पल्प, आमरस, आंबा पोळी आणि वाळवलेला आंबा यांसारख्या उत्पादनांमुळे वर्षभर रोजगार उपलब्ध होतो. यामुळे परकीय चलन मिळवण्यासोबतच आयातीवरील अवलंबित्व कमी झाले आहे.
काजू उद्योग;प्रक्रिया आणि स्वावलंबन –
रत्नागिरी जिल्ह्यातील काजू हा त्याच्या चवीसाठी प्रसिद्ध आहे. मागील तीन वर्षात जिल्ह्यात झालेली फळबाग लागवड पुढीलप्रमाणे आहे.
काजू-
2023-24 1285.18 ha
2024-25 935.79 ha
2025-26 1081.32 ha
स्थानिक प्रक्रिया – पूर्वी कच्चा काजू बाहेर पाठवला जात असे, पण आता जिल्ह्यात काजू प्रक्रिया उद्योग (Cashew Processing Units) मुळे कच्च्या मालाचे रूपांतर मूल्यवर्धित उत्पादनात होऊन स्थानिकांना मोठा नफा मिळत आहे.
बचत गटांचे योगदान – ग्रामीण भागातील महिला बचत गट काजू सोलायच्या उद्योगात मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहेत, जे महिला सक्षमीकरणाचे आणि आत्मनिर्भरतेचे उत्तम उदाहरण आहे.
मत्स्यव्यवसाय आणि नीलक्रांती (Blue Economy) –
१६७ किमीचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेल्या रत्नागिरीने मत्स्योत्पादनात मोठी झेप घेतली आहे. मिरकरवाडा, साखरीनाटे आणि दाभोळ यांसारख्या बंदरांवरून मोठ्या प्रमाणात मासळीची उलाढाल होते. 2024-25 नुसार 71 हजार 303 टन उत्पादन झाले आहे. हे प्रमाण राज्याच्या तुलनेत 15.4 टक्के आहे. हर्णे पापलेट, सुरमई, कोळंबी , बांगडा, तार्ली, स्किड यांसारख्या मासळीला मोठी मागणी आहे. जिल्ह्यात उभारलेले ‘कोल्ड स्टोरेज’ आणि ‘फ्रोजन फिश’ प्लँट्स मासळीची गुणवत्ता टिकवून ती परदेशात पाठवण्यास मदत करतात. नाईक, गद्रे आणि जिलानी यासारख्या कंपन्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील मासळी आंतरराष्ट्रीय बाजारात आपले स्थान टिकवून आहे. 2023-24 नुसार एकूण 2 लाख 46 हजार 9 टन मासे निर्यात झाले असून त्यापोटी 6 हजार 582.04 कोटी रुपये मिळाले आहेत. यामुळे ‘नीलक्रांती’च्या माध्यमातून जिल्हा देशाला आर्थिक बळ देत आहे.
पर्यटनाचे नवे पर्व : आर्थिक प्रगतीचे नवीन दालन –
पर्यटन हे रत्नागिरीच्या ‘आत्मनिर्भर’ प्रवासातील एक महत्त्वाचे क्षेत्र ठरत आहे.
कृषी-पर्यटन (Agri-Tourism) – आंबा आणि काजूच्या बागांमध्ये पर्यटकांना राहण्याची सोय करून ‘ॲग्रो-टुरिझम’ विकसित झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतीसोबतच पर्यटनातून अतिरिक्त उत्पन्न मिळत आहे. गणपतीपुळे, थिबा पॅलेस, दापोली, गुहागर, कशेळी, दाभोळ, लाडघर अशा नैसर्गिक समुद्र किनाऱ्यांबरोबरच रत्नदूर्ग, रसाळगड, महिपतगड, पूर्णगड यासारख्या गडकिल्ल्यांकडे, ऐतिहासिक स्थळांकडे, धूतपापेश्वर, सूर्यमंदिर यासारख्या धार्मिक स्थळांकडे पर्यटकांचा ओघ वाढला आहे. ‘होमस्टे’ (Homestay) आणि स्थानिक खाद्यपदार्थांच्या हॉटेलमुळे (उदा. कोकणी मेजवानी) हजारो तरुणांना स्वतःच्या गावातच रोजगार मिळाला आहे.
रत्नागिरी शहरातील नवे पर्यटन स्थळ – ऐतिहासिक रत्नदूर्ग किल्ल्याच्या पायथ्याला पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी नगरपरिषदेच्या माध्यमातून शिवसृष्टी उभारली आहे. थिबा पॅलेस परिसरात थ्रिडी मल्टीमीडिया शो, श्रीमान हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगणमधील शो,या परिसरात उभारण्यात आलेले भारतरत्न सन्मानित व्यक्तीमत्वांचे अर्धपुतळे, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आणि त्यांच्या जीवनांवर आधारित भितीशिल्प, तुलशी वृंदावन श्री विठ्ठलाची सर्वात उंच मुर्ती ही नवी पर्यटन स्थळे उदयास आली आहेत. लाखो पर्यटकांनी याचा लाभ घेतला आहे.
4 ते 30 डिसेंबर 2025 या कालावधीत भेट दिलेले पर्यटक आणि नगरपरिषदेला मिळालेले उत्पन्न
तारांगण – पर्यटक 3 हजार 97, रक्कम – 2 लाख 15 हजार
शिवसृष्टी – पर्यटक 11 हजार 598, रक्कम – 2 लाख 81 हजार 430
जिजामाता उद्यान – पर्यटक 16 हजार 900 – रक्कम 1 लाख 57 हजार
थिबा पॅलेस थ्रिडी मल्टीमीडिया शो – पर्यटक 2 हजार 380 – 1 लाख 81 हजार 890
हाऊस बोट प्रकल्प – उमेद महाराष्ट्र राज्य जीवन उन्न्वती अभियान जिल्हा परिषद सिंधु रत्न समृध्द योजनेच्या माध्यमातून पर्यटन वाढीस चालना देण्यासाठी 5 महिला प्रभाग संघांना हाऊस बोट देण्यात आल्या आहेत. त्यापैकी 2 हाऊस बोट जयगड, सैतवडे, जांभरी, आगरनरळ तसेच राई –भातगाव अशा ठिकाणी 2 हाऊस बोटीच्या माध्यमातून महिला हाऊस बोट प्रकल्प केरळच्या धर्तीवर चालवत आहेत. तसेच 17 सिटर एसी ट्युरिस्ट व्हॅन देखील प्रभाग संघांना देण्यात आल्या आहेत. त्या माध्यमातूनही या महिला स्वयंपूर्ण बनत आहेत.
व्होकल फॉर लोकल आणि स्टार्टअप्स – काजू, आंबा, कोकम सरबत, फणस प्रक्रिया उत्पादने, विविध प्रकारचे मध, नाचणी, ज्वारी, तांदूळ यांची पापड, चकली, लोणचे, विविध खाद्यपदार्थ, मसाले यासारखी उत्पादने तसेच प्रक्रिया उद्योग आणि बांबूपासून बनवलेल्या वस्तू यांसारख्या ‘लोकल’ उत्पादनांना मोठी मागणी मिळत आहे. सरसच्या प्रदर्शन आणि विक्रीच्या माध्यमातून महिलांच्या या उत्पादनाला जिल्हा परिषद बाजारपेठ मिळवून देत आहे. ‘ई-कॉमर्स’च्या माध्यमातून येथील छोटे उद्योजक आपले उत्पादन थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहेत.
रत्नागिरी जिल्हा आपल्या आंबा, काजू आणि मत्स्य संपत्तीच्या जोरावर देशाला परकीय चलन मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. निसर्ग आणि तंत्रज्ञान यांचा मेळ घालत येथील जनता ‘स्वदेशी’ आणि ‘स्वावलंबन’ या मंत्राचा प्रत्यक्ष वापर करण्यासाठी प्रयत्नशील आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ घडवताना रत्नागिरी हे एक यशस्वी मॉडेल म्हणून देशासमोर उभे राहत आहे.
000 – प्रशांत कुसुम आंनदराव सातपुते जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी




