
खोकासुरांनी मुंबई महापालिकेत ३ हजार कोटींचा घोटाळा केला -उद्धव ठाकरें
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात एक ऐतिहासिक आणि वादळी वळण पाहायला मिळाले. तब्बल २० वर्षांनंतर राज ठाकरे यांनी शिवसेना भवनाची पायरी चढली आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेत ‘शब्द ठाकरेंचा’ हा वचननामा जाहीर केला.वचननामा प्रसिद्ध करताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर सडकून टीका केली. ‘खोकासुरांनी मुंबई महापालिकेत ३ हजार कोटींचा घोटाळा केला आहे,’ असा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंनी केला. तसेच सरकारवर निशाणा साधताना ते म्हणाले की, ‘महापालिकेच्या ठेवी कंत्राटदारांचे बूट चाटण्यासाठी नसून मुंबईकरांच्या हितासाठी आहेत. गल्लीबोळात रस्ते बांधले तरी हे लोक टोल वसूल करतात, ही लूट थांबली पाहिजे.’
नार्वेकर स्वतःला ‘नायक’ समजतात का?
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर हल्लाबोल करताना उद्धव ठाकरे चांगलेच संतापलेले दिसले. ‘नार्वेकर स्वतःला नायक चित्रपटातील अनिल कपूर समजत आहेत का? असा खोचक सवाल त्यांनी विचारला. ‘अध्यक्ष कोणत्याही पक्षाचा नसून तो विधिमंडळाचा असतो. प्रचारात सहभागी होऊन त्यांनी पदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे. निवडणूक आयोगाने त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करावे, अशी मागणी ठाकरेंनी केली आहे.
लोकशाहीचा अपमान आणि मोदींवर निशाणा
राज्यात सुरू असलेल्या ‘बिनविरोध’ निवडणुकीच्या प्रक्रियेवरही त्यांनी आक्षेप घेतला. लोकशाही संपवून झुंडशाही सुरू झाल्याचे सांगत, जिथे निवडणुका बिनविरोध झाल्या तिथे पुन्हा मतदान घेण्याची मागणी त्यांनी केली. पंतप्रधान मोदींवर टोलेबाजी करताना ते म्हणाले, ‘आता उद्या हे म्हणतील की कैलास पर्वत आणि समुद्र मंथनही मोदींनीच केले आहे! आमच्या कामाचे श्रेय घेण्यापेक्षा स्वतःचे काम करून दाखवा’.




