
’स्पर्श’, ’कुसुम’मधून कुष्ठरोगाचे निर्मूलन करण्यासाठी व्यापक मोहीम राबविण्यात येणार
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त दि. ३० जानेवारी हा दिवस कुष्ठरोग निवारण दिन म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत ’स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान तसेच ’कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम)’ ही विशेष मोहीम व्यापक स्वरुपात राबविण्यात येणार आहे.
’भेदभाव समाप्त करू या, सन्मानाची वागणूक देऊ या’ हे स्पर्श जनजागृती अभियान २०२६ चे घोषवाक्य असून, कुष्ठरोगाबाबत समाजात असलेले गैरसमज, भीती आणि कलंक दूर करणे, तसेच लवकर निदान व वेळेवर उपचाराचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. आजही कुष्ठरोगाविषयी असलेल्या गैरसमजांमुळे रुग्णांच्या सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक आणि व्यावसायिक जीवनावर विपरीत परिणाम होत असल्याचे चित्र आहे. ही स्थिती बदलण्यासाठी जिल्हाभर विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.
स्पर्श अभियानांतर्गत शाळा, महाविद्यालये, महिला बचत गट, तरुण मंडळे, बाजारपेठा, आरोग्य मेळावे, प्रभात फेर्या, नुक्कड नाटके, मॅरेथॉन तसेच वक्तृत्व, चित्रकला व रांगोळी स्पर्धा, प्रदर्शन आणि प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती केली जाणार आहे.
www.konkantoday.com




