सरकारी नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून चिपळूण आणि संगमेश्वर परिसरातील अनेक तरुणांना तब्बल ४० लाख ८५ हजार ५८४ रुपयांचा गंडा


सरकारी नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून चिपळूण आणि संगमेश्वर परिसरातील अनेक तरुणांना तब्बल ४० लाख ८५ हजार ५८४ रुपयांचा गंडा घालणाऱ्या एका भामट्यावर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महेश भास्कर म्हात्रे (रा. जिते, ता. पेण, जि. रायगड) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी नितीन श्रीकांत रसाळ (वय ४०, रा. बुरंबाड, ता. संगमेश्वर) यांनी फिर्याद दिली आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२२ ते मे २०२४ या कालावधीत संशयित आरोपी महेश म्हात्रे याने फिर्यादी रसाळ आणि त्यांच्या ओळखीच्या इतर सात लोकांना सरकारी नोकरीचे स्वप्न दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला. या बदल्यात त्याने रसाळ यांच्याकडून ६ लाख आणि इतर सात जणांकडून १८ लाख २५ हजार अशी एकूण २४ लाख २५ हजार रुपयांची रोकड स्वीकारली. मात्र, कोणालाही नोकरी न लावता ही सर्व रक्कम त्याने स्वतःकडेच ठेवून घेतली.
​फसवणुकीचा हा प्रकार इथेच थांबला नाही. आरोपीने फिर्यादी रसाळ यांच्या नावावर जनता सहकारी बँक आणि एचडीएफसी बँक (शाखा चिपळूण) मधून बनावट कर्ज प्रकरणे केली. या कर्जातून त्याने ह्युंदाई कंपनीची अल्काझार कार, बुलेट मोटारसायकल आणि दोन महागडे मोबाईल खरेदी केले. या कर्जाचे हप्ते मे २०२४ पासून न भरल्यामुळे सुमारे १६ लाख ६० हजार ५८४ रुपयांची थकबाकी रसाळ यांच्या नावावर राहिली आहे. जेव्हा फिर्यादीने आपल्या पैशांबाबत विचारणा करण्यासाठी आरोपीला फोन केला, तेव्हा त्याने त्यांना अश्लील शिवीगाळ करत ‘तुझी वाट लावेन आणि तुला बदनाम करेन’ अशी धमकी दिली. अखेर आपली मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रसाळ यांनी ७ जानेवारी २०२६ रोजी पोलिसांत धाव घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button