
शौचालय घोटाळ्या प्रकरणावरून रत्नागिरी नगर परिषदेत सत्ताधारी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यात जोरदार वादावादी झाली ,कागदपत्रांच्या मागणीवरून वादाची ठिणगी
शौचालय घोटाळ्या प्रकरणावरून
रत्नागिरी नगर परिषदेत गुरुवारी सायंकाळी सत्ताधारी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यात जोरदार वादावादी झाले शौचालय घोटाळ्याशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे मागण्यासाठी गेलेले उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर आणि बांधकाम अभियंता यतीराज जाधव यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. अभियंता जाधव यांनी आपल्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा खळबळजनक आरोप तिवरेकर यांनी केला असून, या प्रकारामुळे पालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २०२१ मधील स्वच्छता अभियानांतर्गत झालेल्या शौचालयांच्या दुरुस्ती कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या कामांच्या खर्चाचा हिशोब आणि निविदेनुसार कामांच्या तपशिलाची (बायफर्केशन) प्रत मागण्यासाठी उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर सायंकाळी ५ च्या सुमारास अभियंता रोहन डांगे यांच्या कक्षात गेले होते. आगामी सर्वसाधारण सभेत या घोटाळ्यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी ही माहिती आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या वेळी तिवरेकर डांगे यांच्याशी चर्चा करत होते, त्याच वेळी तिथून बाहेर पडणारे बांधकाम अभियंता यतीराज जाधव यांनी अचानक हस्तक्षेप केला आणि वादाला सुरुवात झाली.
या घटनेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना समीर तिवरेकर यांनी गंभीर आरोप केले. “मी जाधव यांच्याशी बोलतही नव्हतो, तरीही त्यांनी पूर्वग्रहदूषितपणातून मला शिवीगाळ केली आणि धमकावले,” नगरपालिकेत पारदर्शक कारभार व्हावा आणि घोटाळे समोर यावेत यासाठी आपण प्रयत्नशील असून, ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे त्यांच्या मनात भीती असल्यानेच असा प्रकार घडला असावा, असेही त्यांनी नमूद केले. रत्नागिरीच्या राजकीय संस्कृतीला हे वर्तन शोभा देणारे नाही, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
ही घटना घडली तेव्हा नगरपालिकेचे कर्मचारी, शिवसेनेचे गटनेते बाळू साळवी, पाणी सभापती निमेश नायर आणि अन्य सहकारी नगरसेवक उपस्थित होते. महायुतीच्या सर्व नगरसेवकांनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे.




