शिर्के हायस्कूल येथे महिलांसाठी गर्भाशयमुखाच्या कर्करोगाची मोफत चाचणी

रत्नागिरी : महिलांसाठी गर्भाशयमुखाच्या कर्करोगाची मोफत एचपीव्ही डीएनए चाचणी मालती- जनार्दन फाउंडेशन यांच्या वतीने शहरातील रा. भा. शिर्के हायस्कूल येथे नुकतीच झाली.
पुणे येथील सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कने त्यांच्या इनक्यूबेटी कंपनी आयुजेन बायोसायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडच्या सहकार्याने रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांसाठी गर्भाशयाच्या कर्करोग जागरूकता आणि तपासणी कार्यक्रम यशस्वीरित्या राबविला आहे. महानगर गॅस लिमिटेडच्या (एमजीएल) एमजीएल आरोग्य प्रोग्राम या सीएसआर कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या या उपक्रमाचा उद्देश महिलांमधील दोन क्रमांकाचा गर्भाशय मुखाचा कर्करोग जो की टाळू शकतो त्याच्या लवकर निदान आणि प्रतिबंध करण्यास प्रोत्साहन देणे हा होता. ३० वर्षे व त्या पेक्षा जास्त वयावरील महिलांची एचपीव्ही टेस्ट करण्यात आली. या टेस्टने गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचा प्रतिबंधक करता येतो. ही टेस्ट करण्यासाठी ३ हजार रुपये खर्च आहे. ही चाचणी महिलांसाठी मोफत करण्यात आली.
यावेळी महानगर गॅस लिमिटेडच्या सीएसआर व्यवस्थापक दीपिका शिवकुमार, कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, जीजीपीएस इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका सोनाली पाटणकर, रा. भा. शिर्के हायस्कूलचे मुख्याध्यापक के. डी. कांबळे, आयुजेन बायोसायन्सेसचे संचालक मनीष पुंगलिया, आयुजेन बायोसायन्सेसचे विपणन व्यवस्थापक अभय वैद्य, कॅम्प आयोजक व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी सुमारे २२५ महिलांनी उपस्थिती दर्शवली. महानगर गॅसच्या दीपिका यांनी एमजीएल आरोग्य व त्यांच्या रत्नागिरीमध्ये चालू असणाऱ्या इतर प्रकल्पांबद्दल माहिती दिली.
भारतातील महिलांना होणाऱ्या कर्करोगांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात सामान्य कर्करोग आहे, ज्यामध्ये ३० ते ६० वयोगटातील महिलांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. ग्रामीण भागात या आजाराचे प्रमाण थोडे जास्त आहे. दरवर्षी, भारतात गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगामुळे जवळजवळ १ लाख ३० हजार नवीन रुग्ण आणि ७४ हजार मृत्यू होतात. सुरुवातीच्या टप्प्यात त्याचे लक्षणे नसलेले स्वरूप पाहता, मृत्युदर कमी करण्यासाठी स्क्रीनिंग कार्यक्रमांद्वारे लवकर निदान करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे यावेळी डॉक्टरांनी सांगितले.
महानगर गॅस लिमिटेडचे सीएसआर व्यवस्थापक सुशांत राऊत व सायन्स आणि टेक्नॉलॉजिक पार्कच्या सोनाली भट्टाचार्या -एम जीएल आरोग्य या प्रकल्पाच्या संचालिका यांचे या कार्यक्रमाला मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button