
राज ठाकरेंचा आरोप; “आपल्या देशात निवडणूक आयोग नावाची गोष्टच राहिलेली नाही
मुंबई : महापालिका निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला आहे. या निवडणुकांच्या अनुषंगाने मुलाखती, रॅली, प्रचारसभा या सगळ्यांना उधाण आलं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी युती केली आहे. शिवसेना आणि मनसे दोन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढत आहेत, त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीची रंगत वाढली आहे. दरम्यान राज ठाकरे यांनी निवडणूक आयोग नावाची गोष्टच अस्तित्वात नाही असं म्हटलं आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
“मुंबईपासून अनेक महापालिका तीन चार वर्षांनंतर किंवा सात वगैरे वर्षानंतर होत आहेत. अनेक महापालिकांच्या निवडणुका खूप आधी व्हायला हव्या होत्या. सात-आठ वर्षे निवडणुका लांबणीवर पडत आहेत. मी आजपर्यंत असं चित्र पाहिलेलं नाही. १० वर्षांपूर्वीपर्यंत सांगावं लागायचं नाही की निवडणूक कधी होणार? कारण निवडणुका कधी लागणार याची कल्पनाच द्यावी लागायची नाही. आपोआप कळायचं, आता सात- आठ वर्षांपासून सगळं गुपितच ठेवलं जातं आहे.”
निवडणूक आयोग नावाची गोष्टच या देशात राहिलेली नाही-राज ठाकरे
निवडणुका लावण्यासाठी टायमिंग पाहिलं जातं आहे. कारण १५ जानेवारीला निवडणुका होत आहेत आणि १७ किंवा १८ जानेवारीला मुख्यमंत्री दावोसचा दौरा करणार आहेत. यातून काय सांगायचं आहे त्यांना? दोनच गोष्टी असतील आम्ही हरणारच आहोत गेलो दावोसला काय फरक पडतो? किंवा आम्ही जिंकणारच आहोत काय फरक पडतो ही दुसरी. असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. मुंबई तकच्या चावडी या कार्यक्रमात राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलं आहे. पुढे राज ठाकरे म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांना दावोसला जायचं आहे त्यामुळे निवडणुका १५ जानेवारीला घेण्यात येत आहेत. मला निवडणूक आयोगाबाबत काही बोलायचंही नाही. निवडणूक आयोग नावाची गोष्टच या देशात राहिलेली नाही. सरकार जे सांगेल त्या प्रमाणे सगळ्या गोष्टी हाकायच्या एवढंच फक्त चाललेलं आहे. मला एकट्यालाच हे माहीत आहे असं नाही सगळ्यांना माहीत आहे. सगळ्या गोष्टी सेट करायच्या त्यानंतर प्रचारालाही वेळ द्यायचा नाही आणि सांगायचं हां आता निवडणुका लढवा. याला काय अर्थ आहे? असाही आरोप राज ठाकरेंनी केला.
काँग्रेसही असं कधी वागलं नाही-राज ठाकरे
काँग्रेस पक्षाने सर्वाधिक प्रमाणात राज्य केलं पण काँग्रेसने काही केलं नाही. शिवाय बिनविरोध निवडणूक झाली त्याला काय अर्थ आहे? आमचा अविनाश जाधव सांगत होता एका प्रभागामध्ये तिघांना १५ कोटी रुपये ऑफर झाले. असे पैसे मिळणार असतील तर निवडणुका कशाला घ्यायच्या? मला भारतीय जनताचं काय चाललं आहे तेच समजत नाही. आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यानंतर जनसंघ आणि त्यानंतर भाजपा झाला. त्यानंतर अटलजी वाजपेयींचं सरकार होतं. २०१४ ला भाजपाला बहुमत मिळालं, इतकी वर्षे तुम्ही संघर्ष केल्यानंतर तुम्हाला बहुमत मिळालं. मग दुसऱ्या पक्षातले लोक का लागतात? असा सवाल राज ठाकरेंनी विचारला आहे.




