
राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री! सुनेत्रा पवार यांनी घेतली शपथ;
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवार, दि. २८ जानेवारी रोजी विमान अपघातामध्ये निधन झालं. त्यांच्या जाण्याने पक्ष आणि सरकारमधील त्यांची जागा रिक्त झाली.ती जबाबदारी आता सुनेत्रा पवार यांनी स्वीकारली आहे. त्यांनी राजभवनातील लोकभवनात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंचावर उपस्थिती होती.
तसेच सरकारमधील अनेक मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, राष्ट्रादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, भाजप आणि शिवसेना त्यांची उपस्थिती होती. कुठलाही गाजावाजा न करता अत्यंत साध्या पद्धतीने शपथविधी सोहळा पार पडला आहे. मात्र खातेवाटप पुढील काळात होणार असून सुनेत्रा पवार यांच्याकडे कोणत्या खात्याची जबाबदारी दिली जाते, हे लवकरच स्पष्ट होईल.




