
रत्नागिरी पोलीस दलाच्या ७ सेवा आता ‘आपले सरकार’ पोर्टलवर ऑनलाईन उपलब्ध
नागरिकांना घरबसल्या मिळणार दाखले..
रत्नागिरी : राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कृती आराखड्यांतर्गत रत्नागिरी पोलीस दलाने नागरिकांच्या सोयीसाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आता पोलीस दलाच्या सात महत्त्वाच्या सेवा ‘आपले सरकार’ या अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे नागरिकांना आता विविध परवानग्या आणि प्रमाणपत्रांसाठी पोलीस ठाण्यांमध्ये प्रत्यक्ष फेऱ्या मारण्याची गरज उरणार नाही.
या उपक्रमांतर्गत ध्वनीक्षेपक परवाना, मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा ना-हरकत परवाना, शोभायात्रा, सभा, संमेलन आणि मिरवणूक काढण्यासाठी आवश्यक असणारी परवानगी आता संगणक किंवा मोबाईलच्या माध्यमातून मिळवता येणार आहे. याशिवाय हत्यार परवाना, निमशासकीय कार्यालयातील नोकरीसाठी लागणारी चारित्र्य पडताळणी आणि परदेशात जाण्यासाठी आवश्यक असणारे पोलीस अनुमती प्रमाणपत्र यांसारख्या सेवाही या पोर्टलवर समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
या ऑनलाईन सुविधेचा नागरिकांना मोठा फायदा होत असल्याचे प्रशासकीय आकडेवारीवरून दिसून येत आहे. आतापर्यंत चारित्र्य पडताळणीसाठी सर्वाधिक २४,५५४ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी २१,८८५ अर्जांचा निपटारा करण्यात आला आहे. तसेच ध्वनीक्षेपक परवान्यासाठी ५५९, हत्यार परवान्यासाठी ४९ आणि परदेश प्रवासासाठी ११२ नागरिकांनी ऑनलाईन अर्ज करून या सेवेचा लाभ घेतला आहे.
प्रशासकीय कामात पारदर्शकता आणणे आणि नागरिकांचा वेळ व पैसा वाचवणे हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेने पोलीस दलाच्या या आधुनिक आणि सुलभ सेवांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.




