
रत्नागिरी पोलीसांकडून AI आधारित “RAIDS” अॅपच्या मदतीने हरवलेल्या मुलीचा शोध

रत्नागिरी पोलीस दलाने AI आधारित “RAIDS” (Ratnagiri Advanced Integrated Data System) अॅपच्या प्रभावी वापरातून हरवलेल्या मुलीचा यशस्वी शोध घेतला आहे.
मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या दूरदृष्टी व संकल्पनेतून साकारलेल्या RAIDS अॅप्लिकेशनच्या मदतीने या प्रकरणातील तपासाला मोठी चालना मिळाली.

दिनांक 12/01/2026 रोजी संबंधित मुलगी हरवल्याची तक्रार रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे दाखल झाली होती. त्यानंतर तात्काळ त्या मुलीचे छायाचित्र RAIDS अॅपमधील Missing Persons विभागात अपलोड करण्यात आले. Dev-Drushti AI प्रणालीच्या सहाय्याने तिच्या १०८ वेगवेगळ्या स्वरूपातील AI जनरेटेड प्रतिमा तयार करून शोध मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यात आली.

या तांत्रिक मदतीच्या आधारे हरवलेली मुलगी इगतपुरी रेल्वे स्थानक परिसरात असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक श्री. विवेक पाटील व त्यांच्या तपास पथकाने तात्काळ कारवाई करत मुलीचा सुखरूप शोध घेण्यात यश मिळविले.

सदर मुलीस सुरक्षितपणे रत्नागिरी येथे आणून तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.
AI आधारित RAIDS अॅपच्या प्रभावी वापरामुळे हरवलेल्या व्यक्तींचा शोध जलद व अचूकपणे घेणे शक्य झाले असून, रत्नागिरी पोलीस दलाच्या तंत्रज्ञानाधारित व नागरिक-केंद्रित पोलीसिंगचा हा आणखी एक यशस्वी दाखला ठरला आहे.




