
रत्नागिरी पालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत प्रशासनावर लोकप्रतिनिधींकडून जोरदार टीका, अनेक प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप
रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर शुक्रवारी झालेल्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत गेल्या चार वर्षांतील प्रशासकीय कामकाजावर भाजप व शिवसेनेच्या नगरसेवकांनी जोरदार टीका करत अधिकार्यांची अक्षरशः पळताभुई थोडी केली. शौचालय दुरुस्तीवरील संशयास्पद खर्च, कुत्रे निर्बीजीकरण व मोकाट जनावर पकड मोहिमेतील खर्च, कर्मचार्यांच्या साहित्य खरेदीवरील लाखो रुपयांचा खर्च तसेच महानगर गॅस कंपनीला दिलेल्या सवलतींवरून प्रशासनावर गंभीर आरोप करण्यात आले.
नगर परिषदेची ही पहिली सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेच्या सुरुवातीलाच नगरसेवक राजेश तोडणकर यांनी कुत्रे नसबंदी आणि मोकाट जनावर पकडण्यासाठी झालेल्या खर्चावर प्रश्न उपस्थित केला. माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार या कामांसाठी तब्बल २५ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला असून, प्रत्यक्षात शहरातील परिस्थिती ’जैसे थे’ असल्याचा आरोप त्यांनी केला. इतका मोठा निधी रत्नागिरी पालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत प्रशासनाचा पंचनामा खर्च होऊनही परिणाम दिसत नसल्याने या खर्चाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर यांनी पहिल्याच सर्वसाधारण सभेला बांधकाम अभियंता गैरहजर राहिल्याचा मुद्दा उपस्थित केला. नगराध्यक्षांनी सर्व खातेप्रमुखांना सभेला उपस्थित राहण्याचे आदेश दिले असताना संबंधित अभियंता अनुपस्थित कसा, असा सवाल त्यांनी मुख्याधिकार्यांना केला. मुख्याधिकार्यांनी रजा मंजूर नसल्याची माहिती दिल्यानंतर नगरसेवक अधिक आक्रमक झाले आणि रजा नामंजूर करून संबंधित अधिकार्यावर कारवाई करण्याची मागणी सभागृहात करण्यात आली. दरम्यान, के. सी. जैन नगर येथील नगर परिषदेच्या जागेवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत गाळ्यांचा मुद्दा नगरसेविका स्मितल पावसकर यांनी उपस्थित केला. विकासकाने ही जागा नगर परिषदेच्या ताब्यात दिलेली असतानाही त्या ठिकाणी गाळे कसे उभे राहिले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नगर परिषद मालक असताना गाळेधारकांना पत्रव्यवहाराचा अधिकारच नसल्याचे सांगत, तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली. यावर नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी संबंधित गाळे तत्काळ जमीनदोस्त करण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिले.
सन २०२५-२६ मध्ये साहित्य खरेदीवर नगर परिषद प्रशासनाने ११ लाख रुपये खर्च केल्याचा मुद्दाही सभागृहात गाजला. ८४ कायमस्वरूपी कर्मचार्यांसाठी हा खर्च दाखवण्यात आला असून, एका कर्मचार्यामागे १३ ते १४ हजार रुपयांचा खर्च दाखवण्यात आल्याची माहिती नगरसेवक राजेश तोडणकर व समीर तिवरेकर यांनी दिली. मात्र प्रत्यक्षात कर्मचार्यांना हँडग्लोज, गमबूट, मास्क किंवा अन्य साहित्य मिळाले नसल्याचा आरोप करण्यात आला. मग हे ११ लाख रुपये नेमके कुठे गेले, असा सवाल उपस्थित करत चौकशीची मागणी करण्यात आली. स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत शौचालय दुरुस्ती कामातही मोठा घोळ झाल्याचा आरोप उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर यांनी केला. मांडवी येथील शौचालयाचे काम प्रत्यक्षात न होता देखील बिल अदा केल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. या सर्व प्रकरणांची चौकशी करून दोषींवर कारवाई व रक्कम वसूल करण्याची मागणी सभागृहात एकमुखाने करण्यात आली.
पहिल्याच सर्वसाधारण सभेत प्रशासकीय कारभारावर झालेले हे गंभीर आरोप आणि घेतलेले निर्णय आगामी काळात नगर परिषद प्रशासनासाठी मोठी डोकेदुखी ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महानगर गॅस कंपनीच्या खोदकामावरूनही सभागृह तापले. नगरसेवक निमेश नायर आणि सौरभमलुष्टे यांनी शहरात अनेक ठिकाणी रस्ते खोदूनही ते पूर्ववत न केल्याचा आरोप केला. महानगर गॅस कंपनीकडून वसूल करण्यात आलेले २ कोटी ८३ लाखा रुपये रस्ते दुरुस्ती किंवा सफाई कर्मचार्यांचे वेतन देण्यासाठी वापरण्याऐवजी ठेकेदारांची बिले देण्यासाठी खर्च करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. याशिवाय कंपनीकडून ३० लाख रुपये कमी वसूल करण्यात आल्याचा गंभीर आरोप नायर यांनी केला. यावर नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी संबंधित कंपनीची परवानगी रद्द करण्याचे संकेत दिले.
www.konkantoday.com




