
रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णै बंदरात वेगवान वार्यांमुळे मासेमारी थंडावली
रत्नागिरी जिल्ह्यातील मासेमारीचे प्रमुख केंद्र असलेल्या दापोली तालुक्यातील हर्णे बंदरात गेल्या चार दिवसांपासून निसर्गाचा लहरीपणा पाहायला मिळत आहे. उत्तरेकडून वाहणार्या जोरदार वार्यांमुळे मासेमारी व्यवसायाला मोठा ब्रेक लागला असून जवळपास ५० ते ७० टक्के बोटी सध्या किनार्यावर विसावल्या आहेत. हर्णे बंदर हे जिल्ह्यातील दुसर्या क्रमांकाचे मोठे बंदर मानले जाते. येथे सुमारे ८०० ते ९०० मासेमारी बोटी कार्यरत आहेत. मात्र गेल्या चार दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे आणि समुद्रात वेगाने वाहणार्या उत्तरवार्यांमुळे मच्छीमार हवालदिल झाले आहेत. जे मच्छीमार धाडस करून समुद्रात गेले, त्यांनाही मासळी मिळत नसल्याने रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.
सध्याच्या परिस्थितीत मासेमारीसाठी जाणार्या बोटींना डिझेल आणि मजुरीचा खर्चही निघणे कठीण झाले आहे. समुद्रात मासळी मिळत नसल्याने बोटी मालकांच्या अंगावर आर्थिक भार पडत आहे. परिणामी, तोटा सहन करण्यापेक्षा वारे शांत होईपर्यंत बोटी खाडीत किंवा सुरक्षित ठिकाणी नांगरून ठेवणे मच्छीमारानी पसंत केले आहे. त्यामुळे आता सर्व मच्छीमारांचे डोळे वेगवान वारे निवळण्याकडे लागले असून समुद्रातील वार्याचा वेग कमी झाल्यावरच हर्णे बंदरातील मासेमारी पुन्हा एकदा पूर्वपदावर येईल.www.konkantoday.com




