
रत्नागिरी जिल्ह्यातील विविध भागांत बिबट्याचा वावर ,जिल्ह्यातील १०५ गावांची यादी वनविभागाने केली जाहीर
रत्नागिरी जिल्ह्यातील विविध भागांत बिबट्याचा वावर वाढत असून याची वन विभागाने गांभीर्याने दखल घेतली आहे. वन विभागाने प्रत्यक्ष जागेवर जाऊन खात्री केल्यानंतर, ज्या गावांमध्ये बिबट्या दृष्टीस पडला आहे किंवा त्याचा वावर आहे, अशा गावांची अधिकृत यादी रत्नागिरी वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केली आहे.यामध्ये १०५ गावांचा समावेश असून रत्नागिरी तालुक्यात सर्वात जास्त गावांचा समावेश आहे. नागरिकांनी सतर्क राहावे आणि खबरदारी घ्यावी, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.
रत्नागिरी परिक्षेत्रामध्ये रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर या तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यांमध्ये सध्या बिबट्यांची प्रचंड दहशत आहे. परिक्षेत्रात साधारण १०० ते सव्वाशे बिबटे असण्याची शक्यता वन विभागाने वर्तविली आहे. एवढेच नव्हे तर त्यांचा जंगलातील अधिवास सुमारे आठ ते दहा किमीचा असतो. परंतु बिबट्यांची संख्या वाढल्याने त्यांचा अधिवास घटला असून तो आता ५ किमीच्या दरम्यान आला आहे, असे वन विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे बिबटे आता भक्ष्याच्या शोधात थेट मानवी वस्तीमध्ये शिरत आहेत आणि त्याचे हे प्रमाण वाढत आहे. वारंवार कुत्र्यांवर, जनावरांवर आणि कधी कधी माणसांवरही हल्ले झाल्याच्या घटना सुरूच आहेत.
रत्नागिरी परिक्षेत्र वन अधिकाऱ्यांनी बिबट्याचा वावर असलेल्या गावांची नावे जाहीर केली आहेत. त्यामध्ये:
- राजापूर तालुका: पेंढखळे, सागवे, केरवण, भू, भानवलो, नाटे, तुळसवडे, शिवणे, वडदहसोल, कोळ्ये, ओणी, वाटूळ, आडीवरे, ताम्हाणे ही गावे आहेत.
- रत्नागिरी तालुका: जाकादेवी परिसर, जयगड, सांडेलवण, कोतवडे, करबुडे, हातखंबा, फणसवळे, निवळी, पानवल, चाफेरी, कचरे, गणपतीपुळे, निवेंडी, भगवतीनगर, नेवरे, जाकादेवी, ओरी, वेतोशी, काळबादेवी, चाफे, उंडी, वरवडे, मालगुंड, भंडारपुळे, जांभरुण, भोके, खानू, पाली, नानीज, उंबरे, पावस, हरचेरी, टिके, टेंभ्ये, नाचणे, जुवे, करला, फणसोप, कोळंबे, गोळप, गावखडी, मेर्वी, पूर्णगड, गावडेआंबेरे, दाभिल, आंजारी, मावळंगे, हातिस, चिंचखरी, सोमेश्वर, बाळके, केळवणे, चरवेली, डोळस, कुवारबाव, मिरजोळे, शिरगाव, आडी, साखरतर, कासारवेली गावात बिबट्याचा वावर आहे.
- लांजा परिसर: धडे, वनगुळे, गावाणे, कुरुचे, पुनस, लांजा, घुडेरे, मठ, गोळवल, वाडगाव, कगडवली, विलवडे, हसोळ, आडवली, शिपोशी, वेरवली, खेरवसे, कोर्ले, शिरवली.
- संगमेश्वर क्षेत्र: फुणगुस, कोसुंब, शिवणे, कुरुधुंडा, साखळे, आरवली परिसरात – कुंभारखाणी, राजिवली, राजवाडी, कडवई, धामणी, कजारी, साखरपा परिसर आदींचा समावेश आहे.
बिबट्याचा वावर असलेल्या या क्षेत्रातील नागरिकांनी रात्रीच्या वेळी एकटे बाहेर पडणे टाळावे. घराच्या परिसरात पुरेसा प्रकाश ठेवावा आणि पाळीव प्राण्यांची सुरक्षा सुनिश्चित करावी. बिबट्या दिसल्यास वन विभागाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




