
रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे १४ मार्चला लोकअदालत
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या (मुंबई) यांच्या सुचनेनुसार रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे १४ मार्च रोजी येथील जिल्हा न्यायालय, जिल्हातील सर्व तालुका न्यायालय येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकअदालतमध्ये न्यायालयातील प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी खटले, कौटुंबिक वाद, चेक बाऊस, दिवाणी वाद, वाद दाखलपूर्व प्रकरणा अंतर्गत विदयुत कंपनी, बँका, पतसंस्था यांचे थकीत कर्जाबाबतची दाखल पूर्व प्रकरणे, तसेच नगरपालिका, ग्रामपंचायत थकीत घरपट्टी, पाणीपट्टी वसूलीची प्रकरणे ठेवण्यात आली आहेत.
नागरिकांनी या लोक अदालतचा लाभ घ्यावा व मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आपले वाद सामोपचाराने मिटवावेत असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश विनोद यशवंतराव जाधव यांनी आवाहन केले.
पक्षकारांनी त्यांची प्रकरणे लोक अदालतमध्ये ठेवण्यासाठी आपले वकील, संबंधित न्यायालय अथवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडे संपर्क करावा, असे आवाहन प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील यांनी केले आहे.



