
रत्नागिरीत मच्छीमार बांधवांसाठी शुक्रवारी मोफत विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन
रत्नागिरी:
महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने मिरकरवाडा येथील सर्वसामान्य जनतेसाठी आणि विशेषतः मच्छीमार बांधवांसाठी एका विशेष बाह्य संपर्क आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मच्छीमार बांधवांना त्यांच्या कामाच्या ठिकाणीच पुरेशा आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने हे मोफत तपासणी शिबीर राबवले जात आहे.
हे शिबीर शुक्रवार, दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी मिरकरवाडा येथील उर्दू शाळा क्रमांक १० मध्ये सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत संपन्न होणार आहे. या शिबिरामध्ये नागरिकांची रक्तदाब, मधुमेह आणि रक्ताची सविस्तर तपासणी केली जाईल, तसेच नेत्ररोग, दंत चिकित्सा आणि त्वचारोगावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार दिले जातील. याव्यतिरिक्त, महिलांची स्वतंत्र आरोग्य तपासणी, मानसिक आरोग्य तपासणी आणि आरोग्य व स्वच्छतेबाबत विशेष समुपदेशनही करण्यात येणार आहे. समाजातील वाढत्या व्यसनाधीनतेवर उपाय म्हणून व्यसनमुक्ती आणि कर्करोग जनजागृतीवरही या शिबिरात भर दिला जाणार आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी (जिल्हा परिषद, रत्नागिरी) आणि जिल्हा शल्य चिकित्सक (जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी) यांनी मिरकरवाडा परिसरातील सर्व नागरिकांना या मोफत आरोग्य सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.




