
रत्नागिरीतील राम मंदिरात व अन्य मंदिरांमध्ये चोऱ्या करून धुमाकूळ घालणाऱ्या दोघा चोरट्यांना अटक; १७ लाखांचा मुद्देमाल जप्त
रत्नागिरीसह सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील मंदिरांमध्ये चोऱ्या करून धुमाकूळ घालणाऱ्या दोघा सराईत चोरट्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अक्षय अर्जुन मोरे (वय २८, रा. गोंदिलवाडी, ता. पलूस, जि. सांगली) आणि संभाजी राजाराम जाधव (वय ३०, रा. विकास कारखान्याजवळ, पलूस, जि. सांगली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील विविध मंदिरांमध्ये चोऱ्या केल्याची तसेच सांगली शहरात घरफोडी केल्याची कबुली दिली आहे.
त्यांच्याकडून सुमारे १७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, यामध्ये रत्नागिरीतील श्रीराम मंदिरातील सीतामाईच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी प्रकरणाचाही समावेश आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, २५ डिसेंबर २०२५ रोजी सांगली शहरातील राम मंदिराजवळील संजोग कॉलनीत राहणारे सम्राट विश्वनाथ माने (वय ५३) यांच्या बंगल्यात चोरी झाली होती. या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व त्यांच्या पथकाला चोरीचा माल विक्रीसाठी आरोपी सांगलीवाडीतील फल्ले मंगल कार्यालयाजवळ येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या परिसरात सापळा रचला. संशयित दोघे घटनास्थळी येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
तपासणीदरम्यान त्यांच्या दुचाकीवरील गोणपाटात चांदी, तांबे व पितळेचे पूजेचे साहित्य आढळून आले. तसेच अक्षय मोरेच्या खिशात चार पदरी सोन्याचे मंगळसूत्र सापडले.
पोलिस तपासात असेही उघड झाले की, अक्षय मोरे याला यापूर्वी आरग (ता. मिरज) येथील पद्मावती मंदिर चोरीप्रकरणी अटक झाली होती. त्यानंतर त्याने संभाजी जाधवच्या मदतीने रत्नागिरी जिल्ह्यातील मंदिरांमध्ये चोऱ्या केल्या. तपासात २९ सप्टेंबर २०२५ रोजी रत्नागिरीतील श्रीराम मंदिरातील सीतामाईच्या गळ्यातील मंगळसूत्र व हार चोरी तसेच अर्जुनवाड येथील मंदिरातील गणेशमूर्ती चोरी केल्याचेही निष्पन्न झाले आहे.




