
महिना उलटूनही अहवाल नाही,लोटेतील लक्ष्मी ऑर्गेनिकचा प्रदूषण अहवाल अजुनही गुलदस्त्यात!
लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीविषयीचा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल अद्याप सादर न झाल्याने संशयाचे ढग गडद झाले आहेत. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी गेल्या महिन्यात हा अहवाल दोन दिवसांत जाहीर केला जाईल, असे स्पष्टपणे सांगितले होते. मात्र महिना उलटूनही अहवाल न आल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मुंबई येथील मुख्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आयएएस दर्जाच्या पाच अधिकाऱ्यांनी लोटे येथील लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीची प्रत्यक्ष पाहणी केली होती. या पाहणीनंतर अहवाल तात्काळ सादर होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र हा अहवाल अद्याप ‘गुलदस्त्यात’च राहिल्याने स्थानिक नागरिकांसह पर्यावरणप्रेमींमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी या कंपनीतून उत्पादन सुरू असल्याची माहिती दिली होती. हे उत्पादन गेल्या एक वर्षापासून सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र लक्ष्मी ऑर्गेनिकमधील उत्पादन घातक असून त्यामुळे पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे ठाम मत तटकरे यांनी व्यक्त केले आहे.
या पार्श्वभूमीवर लक्ष्मी ऑर्गेनिकविरोधात वारंवार आंदोलने करण्यात आली आहेत. स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यावरण संघटनांनी कंपनीवर कठोर कारवाईची मागणी लावून धरली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या येणाऱ्या अहवालावर कंपनीचे भवितव्य अवलंबून असल्याचे सांगितले जात होते. मात्र तो अहवाल आजही जाहीर न झाल्याने खात्याच्या कार्यपद्धतीबाबत संशय व्यक्त केला जात आहे.




