
महाराष्ट्राच्या सागरी हद्दीतदेवगड समुद्रात अनधिकृतपणे मासेमारी करणाऱ्या कर्नाटकची नौका जप्त; मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई!
महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत अनधिकृतपणे मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय नौकांविरोधात मत्स्यव्यवसाय विभागाने कडक कारवाई केली आहे देवगड समुद्रात गस्त घालत असताना कर्नाटक राज्यातील ‘हनुमा वैभवा’ ही नौका अवैध ट्रॉलिंग करताना पकडण्यात आली.
देवगड परवाना अधिकारी किरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखालील पथक गस्तीवर असताना, समुद्रकिनारी १६ ते १८ वावा खोलीवर ही नौका मासेमारी करताना आढळली. गस्ती नौकेला पाहताच कर्नाटकच्या नौकेने पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकाने पाठलाग करून तिला ताब्यात घेतले. या नौकेकडे महाराष्ट्राच्या हद्दीत मासेमारी करण्याचा कोणताही वैध परवाना नव्हता.
देवगड पथकाची परप्रांतीय नौकांवरील ही चौथी, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण दहावी मोठी कारवाई आहे. या नौकेवर तांडेलसह ७ खलाशी होते. नौका देवगड बंदरात आणण्यात आली असून त्यातील मासळीचा लिलाव सुरू आहे. यातून मिळणारा पैसा शासकीय खजिन्यात जमा होईल.
महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ आणि सुधारित अधिनियम २०२१ नुसार ही कारवाई करण्यात आली आहे. सहाय्यक आयुक्त सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा अहवाल तयार करण्यात आला असून, सुनावणीनंतर नौकामालकावर मोठी दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. या मोहिमेत किरण वाघमारे यांच्यासह संतोष ठुकरुल, धाकोजी खवळे, योगेश फाटक, अमित बांदकर, नेसवंणकर आणि सावजी यांनी सहभाग घेतला.




