
महायुतीचा मुंबईकरांसाठी वचनामा! पाणीपट्टीला स्थगिती ते बेस्टमध्ये 50 टक्के सवलतीसह अश्वासनांची खैरात
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीने मुंबईकरांसमोर आपली विकासाची दिशा स्पष्ट करत भव्य असा वचननामा जाहीर केला आहे.रोजच्या जीवनाशी थेट जोडलेल्या पाणी, घर, वाहतूक, पर्यावरण, रोजगार आणि सांस्कृतिक अस्मितेच्या मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवत हा वचननामा तयार करण्यात आला आहे. तब्बल 2 लाख नागरिकांच्या सूचना आणि अपेक्षा लक्षात घेऊन हा मांडण्यात आल्याचा दावा महायुतीकडून करण्यात आला आहे. मुंबईच्या भविष्यासाठी हा वचननामा निर्णायक ठरेल, असा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.
मुंबईत आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत हा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये झोपडपट्टीमुक्त मुंबई, मोठ्या प्रमाणावर घरनिर्मिती, पाणीपट्टी वाढीला स्थगिती, बेस्ट सेवांमध्ये सवलत आणि महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांचा समावेश आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, मुंबई महापालिका निवडणूक 15 तारखेला होणार असून ही निवडणूक मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष बदल घडवणारी ठरेल. मुंबईतील मराठी माणसाचे हित जपणे, संस्कृती टिकवणे आणि विकासाला गती देणे, हे महायुतीचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाच वर्षांसाठी पाणीपट्टी वाढीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्याने सामान्य मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महायुतीच्या वचननाम्यात झोपडपट्टीमुक्त मुंबईचे स्वप्न पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आले आहे. धारावीचा विकास डीआरपीच्या माध्यमातून केला जाईल आणि 350 स्क्वेअर फूटपर्यंतची घरे धारावीतच देण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच 20 ते 35 लाख घरांची निर्मिती करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. गिरणी कामगार, सफाई कामगार आणि पुनर्विकास प्रकल्पांतील रहिवाशांसाठीही स्वतंत्र योजना राबवण्यात येणार आहेत.
वाहतूक आणि सार्वजनिक सेवांबाबतही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. बेस्ट बससेवेत महिलांसाठी 50 टक्के सवलत देण्यात येणार असून 2029 पर्यंत बेस्टचा ताफा पूर्णपणे इलेक्ट्रिक करण्याचा संकल्प आहे. सध्या 5,000 असलेली बससंख्या वाढवून ती 10,000 पर्यंत नेण्यात येणार आहे. यामुळे पर्यावरणपूरक आणि सुलभ वाहतूक व्यवस्था निर्माण होईल, असा दावा करण्यात आला आहे.
पर्यावरण आणि पायाभूत सुविधांवरही विशेष भर देण्यात आला आहे. पुढील 5 वर्षांत गारगाई, पिंजाळ आणि दमणगंगा प्रकल्प पूर्ण करून मुंबईचा पाणीपुरवठा वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. हवा प्रदूषण रोखण्यासाठी 17,000 कोटी रुपये खर्चाची पर्यावरण संवर्धन योजना राबवली जाणार आहे. जपानी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मुंबईला पूरमुक्त करण्याचाही निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, महायुतीचा वचननामा केवळ घोषणा नसून पुढील 5 वर्षांत काय साध्य केले याचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला जाईल. मुंबईकरांना मुंबईबाहेर जाण्यास भाग पाडले जाणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी बीडीडी चाळ, अभ्युदय नगर आणि इतर पुनर्विकास प्रकल्पांचा दाखला दिला.




