महानगरपालिका निवडणुकांचे निकाल शुक्रवारी चार वाजेपर्यंत स्पष्ट!


राज्यातील २९ महापालिकांची १६ जानेवारी रोजी होणारी मतमोजणी ही प्रभागनिहाय घेण्याचे निवडणूक आयोगाने ठरवले आहे. काँग्रेससह काही पक्षांनी याला दर्शविलेल्या विरोधाची दखल घेत निवडणूक आयोगाने याबाबतचा निर्णय महापालिका आयुक्तांकडे सोपवला आहे.

मतमोजणी एकत्र असो की प्रभागनिहाय १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होऊन सायंकाळी ४ वाजण्याआधी सर्व महापालिकांचे निकाल लागतील. मतमोजणीला दुसरा दिवस उजाडणार नाही, अशी हमी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.

मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होत आहे. या निवडणुकीची मतमोजणी १६ जानेवारीला होऊन निकाल जाहीर केले जातील. राज्यात प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यासाठी स्वतंत्र मतमोजणी केंद्र राहील. प्रत्येक मोजणी केंद्रांत १६ टेबल लावले जाणार आहेत. प्रत्येक टेबलवर एका प्रभागाची मशीन्स ठेवली जातील. त्यानुसार प्रभागनिहाय किंवा एकत्रित मतमोजणी सुरू केली जाईल. मात्र दाेन्हीही पद्धतीत वेळ तेवढाच लागणार असल्याची माहिती निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी दिली. यापूर्वी निवडणूक मतमोजणी एकाचवेळी हाती घेतली जात होती. मात्र, काही महापालिका आयुक्तांनी प्रभागनिहाय मतमोजणी हाती घेतल्यास ते प्रशासकीयदृष्ट्या सोपे होईल, अशी भूमिका मांडली. एकावेळी मतमोजणी घेतली तर मतमोजणी केंद्रात गर्दी अधिक होण्याची शक्यता आहे. तरी याबाबतचा निर्णय महापालिका आयुक्तांवर सोपवला असून त्यांनी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून निर्णय घ्यायचा आहे.

मुंबईत एकाचवेळी मतमोजणी?

मुंबईतील २२७ प्रभागांची मतमाेजणी सर्व मतमोजणी केंद्रांत प्रभागनिहाय घेण्याबाबत विचार होता. मात्र काही पक्षांनी घेतलेल्या आक्षेपानंतर याबाबत विचार केला जात आहे. शक्यतो मुंबईत एकाचवेळी मतमोजणी घेतली जाईल. यासंदर्भात महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याशीही चर्चा झाली आहे. यासंदर्भात ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतील असे वाघमारे म्हणाले.

बहुसदस्यीय प्रभाग पद्धीतीत सर्व मते देणे बंधनकारक

मुंबई वगळता अन्य २८ महापालिकांमध्ये प्रभाग पद्धतीने निवडणूक होत आहे. त्यामुळे येथे मतदाराला चार तर काही ठिकाणी तीन मते देणे बंधनकारक आहे. चार किंवा तीन मते दिल्याशिवाय मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार नाही. पूर्वी मतदारांना नोटाचा पर्याय नव्हता. आता मतदारांना नोटाचा पर्याय उपलब्ध आहे. उमेदवाराला मत द्यायचे नसेल तर मतदार नोटाला मत देऊ शकतात. चार मते बंधनकारक केल्यामुळे मतांच्या आकडेवारीची जुळणी सोपी होणार आहे, असेही वाघमारे यांनी सांगितले.

मतदारांच्या बोटावर मार्करने खूण

महापालिका निवडणुकीत मतदानावेळी मतदारांच्या बोटावर मार्करने मतदान केल्याची खूण केली जाणार आहे. प्रत्येक मतदान केंद्राला तीन मार्कर पेन देण्यात येणार आहेत. मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या शाईचेच ते पेन असणार आहेत. महापालिका निवडणुकीसाठी राज्यात ४९ हजारहून अधिक मतदान केंद्रे आहेत. या केंद्रांसाठी प्रत्येकी तीन याप्रमाणे जवळपास १ लाख ४८ हजार मार्कर पेनचा पुरवठा केला जाणार असल्याचे वाघमारे यांनी स्पष्ट केले.

तोतया मतदारांना पोलिसांकडे सोपवणार

मुंबई महापालिका निवडणुकीत संभाव्य दुबार मतदारांचा आकडा हा सुरुवातीला ११ लाख ५० हजार इतका होता. मात्र, प्रत्यक्ष पडताळणीत हा आकडा दीड लाख एवढा आहे. दुबार मतदारांना आपण दोन पर्याय दिले आहेत. दुबार मतदाराला ज्या ठिकाणी मतदान करायचे असेल तेथे त्यांना एक अर्ज भरून द्यावा लागेल. अर्ज भरून दिल्यानंतर त्याला त्याच मतदान केंद्रामध्ये मतदान करण्याचा हक्क असेल. इतर मतदान केंद्रावर तो मतदान करू शकणार नाही. तथापि अर्ज न भरता दुबार मतदार मतदान केंद्रावर आला तर त्याला एक हमीपत्र द्यावे लागेल. त्याने इतर कुठल्याही मतदान केंद्रावर आधी मतदान केलेले नाही किंवा नंतर मतदान तो करणार नाही, असे ते हमीपत्र असेल. त्यासाठी कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. तो पात्र मतदार असल्याची खात्री पटल्यानंतर त्याला मतदान करता येईल. मात्र तो तोतया मतदार आढळून आल्यास त्याच्याविरुद्ध कारवाई करून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल,असे वाघमारे म्हणाले.

७५ कोटीचे अमली पदार्थ जप्त

महापालिका निवडणूक आचारसंहितेच्या दरम्यान आतापर्यंत ८ कोटी २८ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. याशिवाय चार कोटी रुपये किमतीचे मद्य, ७५ कोटी ६८ लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ तसेच ९०० च्या आसपास घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. या काळात आचारसंहिता भंगाच्या ३४१ तक्रारी प्राप्त झाल्या असून यापैकी २८० तक्रारी निकाली काढल्या आहेत, अशी माहिती वाघमारे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button