
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राज के. पुरोहित यांचे निधन
रतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी कॅबिनेट मंत्री आणि मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष राज के. पुरोहित यांचे काल रात्री मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते.गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे मुंबईतील भाजपचा एक आक्रमक आणि अभ्यासू चेहरा हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
सलग पाच वेळा आमदार
राज के. पुरोहित हे मुंबईच्या राजकारणातील एक मोठे नाव होते. त्यांचा मुंबईच्या राजकारणात मोठा दबदबा होता. दक्षिण मुंबईतील मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी सलग पाच वेळा विधानसभा निवडणूक जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले होते. त्यांनी १९९०, १९९५, १९९९ आणि २००४ अशा सलग निवडणुकांमध्ये विजय मिळवला होता. युती सरकारच्या काळात (१९९५-१९९९) त्यांनी कामगार, दुग्धविकास आणि संसदीय कार्य मंत्री म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती.




