
प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे माघी यात्रेत भाविकांचा जनसागर लोटला.
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथे माघी यात्रोत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा झाला. यावेळी स्थानिकांसह आसपासच्या गावांतील हजारो भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले आणि यात्रेच्या खरेदीचा उत्साह अनुभवला.
माधी यात्रा ही स्थानिकांची वार्षिक यात्रा म्हणून ओळखली जाते. गणपतीपुळेबरोबरच भंडारपुळे, नेवरे, कोतवडे, मालगुंड, वरवडे, भगवतीनगर, खंडाळा, जयगड, जाकादेवी आणि संपूर्ण रत्नागिरी तालुका व जिल्हाभरातील भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले. भाविकांनी मंदिरात शिस्तबद्ध रांगा लावून दर्शन घेतले आणि नंतर यात्रेतील विविध वस्तू खरेदी करत उत्साह लुटला. गणपतीपुळे देवस्थान समितीकडून यात्रेसाठी अतिशय नीटनेटके नियोजन करण्यात आले होते. पहाटे ५ वाजता मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. मुख्य पुजारी अमित घनवटकर यांच्या हस्ते पूजाअर्चा, मंत्रपुष्प व आरती झाली. यात्रेच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने पाणी, विद्युत पुरवठा, पार्किंग व्यवस्था यावर लक्ष ठेवले, जयगड पोलीस ठाणे परिसरातील गर्दीसाठी चोख बंदोबस्त ठेवले.
यावेळी सांगली जिल्ह्यातील माघी गणेश मंडळाकडून मोफत महाप्रसाद आणि बुंदी लाडूचे वाटप केले गेले, ज्याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला, एसटी बस स्थानक मार्फत रत्नागिरी तालुक्यातून आणि जिल्ह्यातून आलेल्या भाविकांसाठी अतिरिक्त गाड्यांची सोय करण्यात आली. यात्रेत घाटमाथ्यावरील आणि जिल्ह्यातील दुकानदारांनी आपली विविध वस्तू विक्रीसाठी ठेवल्या, ज्यामुळे भाविकांना खरेदीचा आनंद मिळाला.
www.konkantoday.com




