प्रजासत्ताक दिनाच्या दीर्घ सुट्टीत कोकण मार्गावर विशेष गाड्या चालवण्याची मागणी.

खेड : प्रजासत्ताक दिनानिमित्त २३ ते २६ जानेवारी या दीर्घ आठवड्याच्या सुट्टीत मुंबई व पुण्याहून कोकण आणि सिंधुदुर्गकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता लक्षात घेता, कोकण मार्गावर विशेष रेल्वे गाड्या चालवाव्यात, अशी मागणी कोकण विकास समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

दरवर्षी या कालावधीत कुटुंबभेटी, पर्यटन तसेच सार्वजनिक सुट्ट्यांमुळे मुंबई व पुण्याहून चिपळूण, रत्नागिरी, सावंतवाडी आणि सिंधुदुर्गकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी उसळते. परिणामी, नियमित गाड्यांची तिकिटे आठवडे आधीच संपतात आणि अनेक प्रवाशांना महागड्या व असुरक्षित रस्ते वाहतुकीचा आधार घ्यावा लागतो.

या पार्श्वभूमीवर कोकण विकास समितीचे जयवंत शंकर दरेकर आणि अक्षय मधुकर महापदी यांनी कोकण रेल्वे व मध्य रेल्वेकडे खालील विशेष गाड्या सुरू करण्याची मागणी केली आहे.

या विशेष गाड्यांमुळे प्रवाशांना सुरक्षित व परवडणारे प्रवास पर्याय उपलब्ध होतील, तिकिटांसाठी होणारी धावपळ कमी होईल तसेच भारतीय रेल्वेला अतिरिक्त महसूलही मिळेल, असा विश्वास समितीने व्यक्त केला आहे.

तिकिटांची विक्री वेळेत सुरू व्हावी यासाठी आवश्यक मंजुरी आणि मार्ग वाटप लवकरात लवकर करावे, अशी विनंतीही करण्यात आली आहे. कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या हिताचा विचार करून या वारंवार येणाऱ्या मागणीवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

प्रस्तावित विशेष गाड्या
मुंबई सीएसएमटी – सावंतवाडी रोड – मुंबई सीएसएमटी
थांबे : दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप आदी.
रचना : स्लीपर, एसी ३-टियर, एसी २-टियर.
पुणे – सावंतवाडी रोड – पुणे
थांबे : चिंचवड, लोणावळा, कर्जत, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आदी.
रचना : स्लीपर, एसी ३-टियर, एसी २-टियर.
मुंबई सीएसएमटी – चिपळूण – मुंबई सीएसएमटी (दिवसाची विशेष गाडी)
थांबे : दादर, ठाणे, पनवेल, रोहा, कोलाड, माणगाव, खेड, अंजनी आदी.
रचना : द्वितीय श्रेणी आसन व्यवस्था व वातानुकूलित खुर्ची कार.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button