
निवडणूक कालावधीमध्ये खासगी /सार्वजनिक जागेवर झेंडे भित्तीपत्रके लावण्यास निर्बंध
रत्नागिरी, दि. 15 ) : राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 साठी कार्यक्रम 13 जानेवारी 2026 रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकाने निवडणूकीच्या प्रचारासाठी झेंड्याच्या काठ्या उभारणे, कापडी फलक लावणे, भितीपत्रक लावणे, घोषणा लिहीणे, इत्यादी करीता कोणत्याही व्यक्तीची जागा, इमारत, आवार, भिंती इत्यादीवर संबंधीत मालकाची परवानगी शिवाय व संबंधीत परवाना प्राधिकरणाचे परवानगी शिवाय वापर करण्यास जिल्हादंडाधिकारी मनुज जिंदल यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 व सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायदा 1995 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दि. 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत) निर्बंध घातले आहेत.
प्रत्येक इसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनी क्षेपकावर पोलीस विभागाने जाहीर करुन प्रसिध्दी करावी, असेही आदेशात नमूद केले आहे.




