नवीन वर्षात मुंबईकरांनी पाऊल टाकताच त्यांची पहाट पावसांच्या सरींने झाली


भारतासह जगभरात 2026 या वर्षाला सुरुवात झाली आहे. घडाळ्यात बाराचा टोला पडताच फटाक्यांची आतिषबाजी करत हजारो लोकांनी नववर्षाचा आनंद साजरा केला. मात्र नवीन वर्षाला सुरूवात झाल्यानंतर काही तासातच अवकाळी पावसाने हजेरी लावत सरप्राईज दिलं.मुंबईसह आसपासच्या परिसरात आज (1 जानेवारी) पहाटेपासूनच पावसाची रिपरिप पाहायला मिळाली.

नवीन वर्षात मुंबईकरांनी पाऊल टाकताच त्यांची पहाट पावसांच्या सरींसह झाली. आतिषबाजी करून 2025 या वर्षाला गुडबाय केल्यानंतर नवीन वर्षाचा आनंद, उत्साह आणि नव्या अपेक्षांनी मुंबईकरांनी 2026 या नवीन वर्षात पाऊल टाकले. मात्र आज पहाटेपासूनच आकाशातून अवकाळी पावसाच्या सरी कोसळायला लागल्या. ऐन हिवाळ्याच्या मध्यात पावसाने हजेरी लावल्याने अनेकांसाठी नव्या वर्षाची पहिली पहाट आश्चर्याची ठरली.

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पहाटेपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरात ढगांची गर्दी होती. वाशी आणि नवी मुंबईत पहाटेच पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर सीएसएमटी, कुर्ला, भांडूप, विक्रोळी, घाटकोपर, मानखुर्द, विद्याविहार, दादर, प्रभदेवी, लोअर परळ, साकीनाका, कुर्ला, बीकेसी अंधेरीसह अगदी विरारपर्यंत पावसाने तुफान बॅटिंग केली. त्यामुळे सकाळी कामावर निघालेल्या नोकरदार वर्गाची चांगलीच धावपळ उडाल्याचे चित्र दिसून आले.

ऐन हिवाळ्यात पावसाने अचानक एंट्री घेतल्यामुळे तापमानात आणि वातावरणात मोठा बदल जाणवत आहे. थंडी असतानाच पावसाच्या सरींमुळे हवेत गारवा वाढला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांसाठी हा पाऊस सरप्राईज देणार असला, तरी दैनंदिन कामकाजाच्या दृष्टीने काहीसा त्रासदायक ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button