
नगरपरिषदेची पहिलीच सर्वसाधारण सभा वादात, पहिल्याच दिवशी गैरप्रकार उघड,लाखो रुपयांची कामे मंजुरीपूर्वीच पूर्ण, माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांचा गंभीर आरोप
रत्नागिरी नगर परिषदेच्या काल झालेल्या सर्वसाधारण सभेत नुकत्याच निवडून आलेल्या सदस्यांनी प्रशासन काळात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप प्रशासनावर हल्लाबोल केला असतानाच आता माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी या सभेत मंजूर करण्यात आलेल्या अनेक कामांबाबत आक्षेप घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मिलिंद कीर यांनी या सभेमध्ये मांडण्यात आलेल्या विषय आधी काम, नंतर मंजुरी असा धक्कादायक आणि धोकादायक प्रकार झाल्याचा आरोप केला आहे. माजी नगराध्यक्ष मिलिंद कृष्णकांत कीर यांनी हा गंभीर प्रकार उघड केला आहे. या सभेत अनेक विषय मंजुरीसाठी मांडण्यात आले होते मात्र हे विषय मंजूर होण्याआधीच तेथील कामे झाली असल्याचा आरोप कीर यांनी केला आहे.
सभेतील विषय क्रमांक ११ अंतर्गत प्रभाग क्रमांक १४, नगरपरिषद शाळा क्रमांक ३ समोरील व्यायामशाळेच्या बांधकामासाठी ३० लाखांचे अंदाजपत्रक मंजुरीसाठी मांडण्यात आले होते. मात्र, हे काम सभेपूर्वीच पूर्ण झालेले असल्याचे जिओ-टॅग फोटो व व्हिडिओमधून स्पष्ट झाले आहे, असा आरोप कीर यांचा आहे. त्याचप्रमाणे मजगांवरोड नजिक अरुण आईस्क्रीम शेजारील रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविणे, आठवडा बाजार येथील सार्वजनिक शौचालय परिसराचे सुशोभीकरण, ही कामेसुद्धा निविदा व मंजुरीपूर्वीच पूर्ण झाल्याचे समोर आले आहे. याबाबत आता सत्ताधार्यांना मिलिंद कीर यांनी थेट सवाल उपस्थित केला आहे.
ही कामे आधीच पूर्ण झाले असतील तर सभा, निविदा आणि मंजुरी ही केवळ औपचारिकता आहे का? हा प्रकार म्हणजे सरळ सार्वजनिक निधीचा दुरुपयोग नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
शासनाने ठरवून दिलेली कामाची प्रक्रिया असून त्यामध्ये आधी अंदाजपत्रक, निविदा, वर्कऑर्डर, त्यानंतर प्रत्यक्ष काम करायचे असते मात्र या ठिकाणी ही प्रक्रिया पूर्णपणे डावलून कामे केल्याचा आरोप कीर यांनी केला. या प्रकरणात शिवसेना (शिंदे गट) व भाजप नगरसेवकांनी मंजुरी दिल्याचा आरोप कीर यांनी जिल्हाधिकार्यांकडे लेखी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी तसेच ठेकेदारांना बिल देवू नये अशीही मागणी करण्यात आली आहे.
यामुळे आता प्रशासनावर भ्रष्टाचाराचे आरोप सत्ताधारी नगरसेवकांकडून केले जात असताना कीर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाबाबत नगराध्यक्ष व सत्ताधारी नगरसेवक कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. ही पहिलीच सभा रत्नागिरी नगरपरिषदेच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे आणि जर अशाच प्रकारची आधी काम, नंतर मंजुरी ही बेकायदेशीर पद्धत पुढेही सुरू राहिली, तर रत्नागिरी नगरपालिकेची वाटचाल थेट डिझोल्व होण्याच्या दिशेनेच होईल, याचा अंदाज बांधण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही इतके हे चित्र स्पष्ट आहे. असे माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी म्हंटले आहे
www.konkantoday.com




