धामणवणेत होणाऱ्या ‘बांधावरचे संमेलन’च्या बोधचिन्हाचेस्वागताध्यक्ष शशिकांत मोदी यांच्या हस्ते अनावरण

चिपळूण :: महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रातील आजवरचा आगळावेगळा प्रयोग अशी महाराष्ट्रभरातील जिज्ञासूंमध्ये ओळख आणि उत्सुकता मिळवलेल्या ‘बांधावरचे संमेलन’च्या बोधचिन्हाचे अनावरण, संमेलनाचे स्वागताध्यक्ष ‘कवी’ शशिकांत मोदी यांच्याहस्ते करण्यात आले. संमेलनाच्या नियोजनाबाबतची दुसरी बैठक नुकतीच चिपळूणातील सर्व साहित्य संस्थांची मातृसंस्था असलेल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात संपन्न झाली.

चिपळूण शहरापासून जवळ असलेल्या धामणवणे येथील श्रीविठलाई मंदिर परिसरातील ‘साद मयुराची’ शेतजमिनीच्या बांधावर ८ फेब्रुवारी (रविवार) सकाळी ९ ते सायंकाळी ५.३० या वेळेत हे ‘बांधावरचे साहित्य संमेलन’ संपन्न होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्षस्थान जेष्ठ ललित लेखक, कथाकार प्रा. सुहास बारटक्के हे भूषविणार आहेत. या संमेलनाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष आणि सातारा येथील ९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, विजय जोशी (विजो), कथाकथनकार सुरेश देशपांडे उपस्थित राहाणार आहेत. बैठकीत स्वागताध्यक्ष मोदी यांचे ज्येष्ठ भाषा अभ्यासक अरुण इंगवले यांच्याहस्ते स्वागत करण्यात आले. बोधचिन्हाची निर्मिती आणि डिझाईन राघव खर्चे यांनी केले असून संकल्पना प्रा. संतोष गोनबरे यांची आहे. मोदी यांच्याहस्ते राघव खर्चे यांचाही सन्मान करण्यात आला.

या बैठकीस संमेलनाची आयोजक संस्था महाराष्ट्र साहित्य परिषद चिपळूण शाखा, सहभागी संस्था कोकण मराठी साहित्य परिषद चिपळूण शाखा आणि साहित्य भारती चिपळूण शाखा यांचे प्रतिनिधी तसेच चिपळूणातील साहित्यप्रेमी मोठ्यासंख्येने उपस्थित होते. माणूस माती आणि नाती यांचे बंध उलगडणारा हा अनोखा साहित्यिक उपक्रम असून यासाठी ‘प्रवेश मर्यादित असणार आहे. या संमेलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या रसिकांनी वीणा परांजपे यांच्याशी मो. +91-9763281358 येथे संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button