दापोली तालुका मराठी पत्रकार परिषदेचे पुरस्कार जाहीर

दापोलीः- दापोली तालुक्यात पत्रकारितेच्या माध्यमातून समाज, विकास आणि लोकशाही मुल्यांची जपणूक करणाऱ्या पत्रकारांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी दापोली तालुका मराठी पत्रकार परिषदेतर्फे दिले जाणारे २०२६ चे पुरस्कार निवड समितीने जाहीर केले आहेत.
यामध्ये सातत्यपूर्ण कामगिरी पुरस्कार कोकण कट्टा न्यूज चॅनलच्या व निवेदिता फास्ट न्यूजचे पत्रकार सलीम रखांगे यांना जाहीर झाला असून त्यांनी दापोलीतील विविध समस्या आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मांडत त्यांना न्याय मि्ळवून दिला आहे. दैनिक सकाळचे दापोली प्रतिनिधी राधेश लिंगायत यांना विकासात्मक बातम्यासाठी पुरस्कार जाहीर करण्यात आला असून त्यांनी दापोली तालुक्यातील पर्यटन, मच्छीमारांच्या समस्या याबाबत सातत्याने लिखाण केले आहे. पत्रकारितेबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्य जनतेला वैद्यकीय सुविधा मिळवून देण्यासाठी धडपड करणारे दिव्य कोकणचे संपादक अजित सुर्वे यांना सामाजिक बांधिलकी बाबत पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दैनिक सागरचे माटवण वार्ताहार अजित मोरे यांना वैशिष्टयपूर्ण पत्रकारितेबाबतचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
दापोलीतील रामराजे महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेत आपले कोकण या वृत्तपत्र वाहिनीव्दारे पत्रकारितेचा क्षेत्रात पाऊल ठेवून पुणे व मुंबई येथे विविध वृत्तपत्रात काम करणारे सिध्देश शिगवण यांना युवा पत्रकार म्हणून पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कोकण कट्टा ही युटयुब वाहिनी संपूर्ण कोकणबरोबरच परदेशात लोकप्रिय करत पत्रकारिता करणारे दाभोळ गावचे सुपुत्र तेजस बोरघरे यांना विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याची माहिती निवड समितीचे अध्यक्ष जगदीश वामकर यांनी दिली असून निवड समितीमध्ये प्रसाद रानडे, डॉ.प्रशांत परांजपे, प्रशांत कांबळे, रूपेश वाईकर यांचा समावेश होता.
सदर पुरस्कार रामराजे महाविद्यालयात आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात 6 जानेवारी रोजी पद्मश्री दादा इदाते यांच्या हस्ते देण्यात येणार असून रामराजे महाविद्यालयाचे संस्थापक संदीप राजपुरे, दापोली नगराध्यक्षा सौ. कृपा घाग, जालगांवचे सरपंच तथा उद्योजक अक्षय फाटक, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा तथा नगरसेविका साधना बोत्रे, दशानेमा गुजर युवक संघटना व जेसीआय दापोलीचे अध्यक्ष डॉ.कुणाल मेहता यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार असून या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित रहावे असे आवाहन दापोली तालुका मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शैलेंद्र केळकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button