
ताम्हिणी घाटात थार अपघाताची पुनरावृत्ती, कार पुन्हा दरीत कोसळली; चालकाचा मृत्यू!
नोव्हेंबर महिन्यात झालेल्या ताम्हिणी घाटात झालेल्या थार दुर्घटनेची पुनरावृत्ती घडली आहे. थार गाडीच्या ज्या ठिकाणी अपघात झाला होता, त्याच ठिकाणाहून एक कार दरीत कोसळली आहे. ज्यात चालकाचा मृत्यू झाला आहे. मृताची ओळख अद्याप पटलेली नाही.
ताम्हिणी घाटात सणसवाडी येथे २० नोव्हेंबरला थार गाडी दरीत कोसळून अपघात झाला होता. या अपघातात पुण्यातील सहा तरुणांचा मृत्यू झाला होता. बेपत्ता तरूणांचा ड्रोन कॅमेऱ्यांनी शोध घेतल्यानंतर ५०० फूट खोल दरीत अपघातग्रस्त गाडी आढळून आली होती. या घटनेची पुनरावृत्ती आज झाली. सणसवाडी येथील त्याच ठिकाणावरून एक कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने खोल दरीत कोसळली. दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास ही घटना घडली. ज्याच चालकाचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच, माणगाव पोलीस आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाले. ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने दरित पडलेल्या गाडीचा शोध घेण्यात आला. तेव्हा नोव्हेंबर महिन्यातील अपघातग्रस्त थार गाडीच्या शेजारीच ही गाडी कोसळून अडकली असल्याचे दिसून आले. बचाव पथकांचे कर्मचारी तातडीने दोरीच्या सहाय्याने खाली उतरले, त्यांनी अपघातग्रस्त गाडीतून चालकाला बाहेर काढले मात्र तोवर त्याचा मृत्यू झाला होता. मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही अशी माहिती पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराटे यांनी दिली.




