डिजिटल अरेस्टची भीती दाखवत दापोलीतील ज्येष्ठ नागरिकाला १ कोटी २३ लाखाला लुटले; गुन्हा दाखल!


  • बेंगळूर पोलीस व सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून “डिजिटल अरेस्ट” ची भीती दाखवत दापोली तालुक्यातील मुरुड खालची पाखाडी येथील ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १ कोटी २३ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, याबाबतची मकरंद श्रीनिवास जोशी (वय ६२, व्यवसाय सेवानिवृत्त, रा. मुरुड खालचीपाखाडी, ता. दापोली) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या तक्रारीनुसार, ४ नोव्हेंबर २०२५ ते १९ जानेवारी २०२६ या कालावधीत आकाश शर्मा, शिवप्रकाश व दया नायक (पूर्ण पत्ता माहीत नाही) या व्यक्तींनी वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून संपर्क साधला.

आपण बेंगळूर पोलीस तसेच नवी दिल्ली येथील सीबीआय अधिकारी असल्याचे भासवत, फिर्यादी यांच्या नावाने कॅनरा बँक, माटुंगा (मुंबई) येथे खाते असून त्यातून ३ कोटी रुपयांचा फ्रॉड झाल्याचे सांगण्यात आले. याची कुणालाही माहिती दिल्यास ५० लाखांचा दंड व डिजिटल अरेस्ट करण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली. तसेच ‘सिंगल’ या ॲपवरून सातत्याने संपर्क साधून फिर्यादी यांच्यावर मानसिक दबाव टाकण्यात आला.

यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना अ‍ॅक्सिस बँक (तुळजापूर), आयडीएफसी बँक (मुंबई), आयसीआयसीआय बँक (वाशी, नवी मुंबई) येथील खात्यांमध्ये रक्कम भरण्यास भाग पाडले. या माध्यमातून एकूण १ कोटी २३ लाख रुपये उकळल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ०७/२०२६ अन्वये बी.एन.एस. कलम ३१८(२), ३१८(४), ३१९(२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६(ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपींना अटक करण्यात आलेली नसून, गुन्ह्याचा तपास दापोली पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button