
चिपळूण: अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
चिपळूण – एप्रिल २०२५ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून, धमक्या देऊन वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून तिला गर्भवती केल्याच्या प्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी मंदार मंगेश कदम (कापसाळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पीडित अल्पवयीन मुलीने चिपळूण पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, मंदार कदम याने तिला लग्नाचे आश्वासन देऊन फसवले आणि धमकावून अनेकदा शारीरिक शोषण केले. यामुळे ती गर्भवती झाली. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करून संशयित मंदार कदम याला ताब्यात घेतले.
पोलिस तपासादरम्यान संशयिताच्या मोबाईलमधून अनेक संशयास्पद माहिती समोर आले असून, तो गांजा सेवन करणारा असल्याचीही माहिती पुढे आली आहे. यामुळे त्याच्याविरोधात आणखी काही प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली असून, पीडितेच्या वैद्यकीय तपासणी आणि इतर पुराव्यांचा अभ्यास करत आहेत.




