गैरप्रकारमुक्त परिक्षेसाठी दहावी, बारावीच्या सर्व परीक्षा केंद्रातील प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्ही कॅमेरे


गैरप्रकारमुक्त परिक्षेसाठी दहावी, बारावीच्या सर्व परीक्षा केंद्रातील प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत राज्य मंडळाने निर्देश दिले आहेत. कोकण मंडळांतर्गत १७५ केंद्रांपैकी ७० म्हणजे ४० टक्के केंद्रांनी आजअखेर परीक्षेशी संबंधित प्रत्येक वर्ग खोलीत कॅमेरे बसवले आहेत. उर्वरित १०५ परीक्षा केंद्रांच्या संस्थाचालक व प्राचार्यांना बैठका घेवून पुढील दहा दिवसात कॅमेरे बसविण्याबाबत विभागीय मंडळाने सूचना केल्या आहेत. गैरप्रकारमुक्त परीक्षेसांसाठी चालू वर्षी सर्वच परीक्षा केंद्राचे केंद्रसंचालक व कर्मचारी यांची अदलाबदल करण्यात येणार आहे.
दरम्यान सोमवार १२ जानेवारीपासून बारावीचे हॉल तिकिट ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास प्रारंभ झाला आहे. चालू शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील राज्याच्या माध्यमिक  व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. तर त्यापूर्वी तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित केली आहे. दहावीची लेखी परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे. तर तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा २ ते १८ फेब्रुवारी कालावधीत होणार आहे.
शासन निर्णय १३ मे २०२५ अन्वये शाळा व परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे बसविणेबाबत निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार आगामी फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या इयत्ता दहावी व बारावी परीक्षांसाठी निश्‍चित केलेल्या सर्व परीक्षा केंद्रांवर व परीक्षेशी संबंधित सर्व वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे राज्य मंडळाचे पत्र ९ डिसेंबरनुसार अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच परीक्षा केंद्रातील प्रत्येक वर्ग खोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत केंद्र असलेल्या सर्व शाळा प्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button