गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणे रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समिती.

राज्यातील गड-किल्ले आणि राज्य संरक्षित स्मारकांचे ऐतिहासिक महत्त्व जपण्यासाठी आणि या स्थळांवरील वाढती अतिक्रमणे रोखण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने काढलेल्या एका शासन निर्णयानुसार राज्यातील गड-किल्ले तसेच राज्य संरक्षित स्मारकांच्या ठिकाणची अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे हटवण्यासाठी नवीन राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय समित्यांची घोषणा केली आहे.
यापूर्वी केवळ गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणांबाबत शासन निर्णय अस्तित्वात होता, मात्र राज्य संरक्षित स्मारकांच्या ठिकाणी व्यावसायिक आणि पर्यटनाच्या नावाखाली होणार्‍या अनधिकृत बांधकामांमुळे वारसास्थळांचे मोठे नुकसान होत असल्याचे विधिमंडळ सदस्यांनी निदर्शनास आणून दिले होते. या पार्श्वभूमीवर सुधारित आदेश निर्गमित करण्यात आला आहे.
या मोहिमेवर देखरेख ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री असतील तर महसूलमंत्री सह-अध्यक्ष म्हणून काम पाहतील. या समितीत ग्रामविकास, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम, वने आणि बंदरे विकास विभागाच्या मंत्र्यांसह विविध विभागांच्या अपर मुख्य सचिवांचा समावेश करण्यात आला आहे. ही समिती अतिक्रमणे हटवण्यासाठी धोरण तयार करणे, त्या धोरणांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आणि ऐतिहासिक वारसा स्थळांवर पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची खबरदारी घेणे अशा जबाबदार्‍या पार पाडणार आहे. याशिवाय, राज्यस्तरीय समिती दर चार महिन्यांनी बैठक घेऊन जिल्हास्तरीय समित्यांच्या कामाचा आढावा घेईल.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button