उपनगराध्यक्षपदी विनय गुरव यांच्या नावाची निश्चिती; स्वीकृतपदी महेश शिवलकर

राजापूर : मंगळवारी होणाऱ्या राजापूर नगरपालिकेच्या नूतन सभागृहाच्या बैठकीत उपनगराध्यक्षांची तसेच दोन्ही गटांतून प्रत्येकी एका स्वीकृत सदस्याची निवड होणार आहे. सत्ताधारी राजापूर शहर विकास आघाडीच्या वतीने उपनगराध्यक्षपदासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक विनय गुरव यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे, तर या गटाचे प्रमुख ॲड. जमीर खलिफे यांनी स्वीकृत नगरसेवक म्हणून पत्रकार तसेच राजापूर तालुका ओबीसी समन्वय समितीचे अध्यक्ष महेश शिवलकर यांच्या नावाची शिफारस जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केली आहे.

शिंदे शिवसेना आणि भाजपाच्या वतीने स्वीकृत नगरसेवकाच्या नावावरील शिक्कामोर्तब तसेच उपनगराध्यक्षपदासाठी उमेदवाराची निश्चिती सोमवारी करण्यात येणार आहे. सद्या मतदारसंघाबाहेर असलेले आमदार किरण सामंत हे सोमवारी राजापुरात येताच याबाबत निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

नगरपालिकेच्या नव्या सभागृहात काँग्रेस तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षांत नगराध्यक्षांसह एकूण अकरा सदस्यांचे संख्याबळ आहे. महाविकास आघाडीद्वारे निवडणूक लढवलेल्या या पक्षांतील नगरसेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नगराध्यक्षा सौ. हुस्नबानू खलिफे यांच्या नेतृत्वाखालील आपल्या गटाची नोंदणी राजापूर शहर विकास आघाडी म्हणून केली आहे. राजापूर शहर विकास आघाडीचे गटनेते म्हणून ॲड. जमीर खलिफे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे, तर महायुतीच्या वतीने निवडणुकीचा सामना केल्यानंतर या पक्षाच्या वतीने विजयी झालेल्या दहा नगरसेवकांनी आपल्या गटाची नोंद राजापूर शहर शिवसेना विकास आघाडी या नावाने केली आहे. या गटाचे नेते म्हणून ॲड. राहुल तांबे यांची निवड करण्यात आली आहे.

सत्ताधारी राजापूर शहर विकास आघाडीकडे एकूण अकरा सदस्यांचे संख्याबळ आहे. शिवाय नगराध्यक्षांना असलेल्या एका कास्टिंग व्होटचा फायदा या गटाला मिळणार आहे, तर विरोधी राजापूर शहर शिवसेना विकास आघाडीकडे दहा सदस्यांचे संख्याबळ आहे. मंगळवारी दुपारी २.३० वाजता उपनगराध्यक्ष तसेच स्वीकृत नगरसेवक निवडीची प्रक्रिया होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button