
ई-गव्हर्नन्समध्ये रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालय राज्यात पाचवे
महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवसीय ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत शासकीय कामकाज अधिक पारदर्शक, कार्यक्षम व नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने करण्यात आलेल्या मूल्यमापनात जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केल आहे. महाराष्ट्रातील ३४ पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये सर्वोत्कृष्ट पोलीस अधीक्षक कार्यालय या श्रेणीत जिल्ह्याने राज्यात ५ वा क्रमांक पटकावला आहे.
या उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांचे मूल्यमापन क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेमार्फत करण्यात आले. या मूल्यमापनाच्या आधारे विविध श्रेणींतील उत्कृष्ट शासकीय कार्यालयाची निवड करण्यात आली असून, त्याचे निकाल २६ जानेवारी रोजी महाराष्ट्र शासनामार्फत जाहीर करण्यात आले.
१५० दिवसीय ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत भारतीय गुणवत्ता परिषदेतर्फे शासकीय कार्यालयांचे पुढील सात महत्वाच्या निकषांवर मूल्यमापन करण्यात आले. या कार्यालयाची अधिकृत वेबसाईट, आपले सरकार प्रणालीचा प्रभावी वापर, ई-ऑफीस प्रणालीची अंमलबजावणी, कार्यालयीन डॅशबोर्ड, व्हॉटसअप चॅटबॉटचा वापर, शासकीय कामकाजात एआय व ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर, जीआयएस तंत्रज्ञानाचा कार्यक्षम वापर आदींचा समावेश होता. सर्व निकषांची जिल्हा पोलीस दलामध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली.www.konkantoday.com




