
आरोग्य विभागात नोकरी लावून देतो असे सांगून तरुणाची साडेअकरा लाखाची फसवणूक
विविध प्रकारचे आमिषे दाखवत फसवणुकीचे प्रकार घडत आहेत असाच एक प्रकार रत्नागिरी तालुक्यात घडला आहे आरोग्य विभागात नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून एका तरुणाकडून तब्बल ११ लाख ३९ हजार ५११ रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही फसवणूक २०२२ ते २०२५ या कालावधीत झाल्याचे समोर आले असून, या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनीया तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी समीर म्हस्के, रोहित प्रकाश म्हस्कर व अन्य एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
करबुडे (ता. रत्नागिरी) येथील रहिवासी उमेश शांताराम धनावडे (वय ३३) यांनी या संदर्भात पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, समीर म्हस्के याने उमेशच्या भावाला तसेच मित्राला आरोग्य विभागात नोकरी लावून देतो, अशी बतावणी केली. नोकरी मिळवण्यासाठी काही रक्कम भरावी लागेल, असे सांगत त्याने वेळोवेळी पैसे मागितले.
नोकरी लागणार असल्याच्या आशेने उमेश धनावडे याने समीर म्हस्केच्या सांगण्यावरून रोहित प्रकाश म्हस्कर तसेच अन्य एका संशयिताच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा केले. २७ जानेवारी २०२२ ते १ मे २०२४ या कालावधीत ठाणे येथील वर्तकनगर शाखेतील रोहित म्हस्करच्या खात्यात ६ लाख ८६ हजार ५६१ रुपये जमा करण्यात आले. त्यानंतर ३० मार्च २०२२ ते १९ मे २०२२ दरम्यान रोहितच्या दुसऱ्या खात्यावर ९३ हजार ९५० रुपये, तर १३ मे २०२४ ते १० जून २०२४ या कालावधीत १ लाख ८४ हजार रुपये पाठवण्यात आले. याशिवाय, अन्य एका व्यक्तीने फोनवरून सांगितल्यानुसार १० हजार रुपये बँक ट्रान्स्फर करण्यात आले.
इतकेच नव्हे, तर १७ ऑक्टोबर २०२५ रोजी समीर म्हस्केला गुगल पेच्या माध्यमातून आणखी १ लाख ६२ हजार रुपये ट्रान्स्फर करण्यात आले. एवढी मोठी रक्कम देऊनही नोकरी न मिळाल्याने अखेर आपली फसवणूक झाल्याचे उमेश धनावडे यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.




