आंबा (ता. शाहूवाडी) परिसरात गेल्या महिनाभरापासून बिबट्याची दहशत कायम ,चक्क भरदुपारी दोन बिबट्यांचे दर्शन


कोल्हापूर जिल्ह्यातील आंबा (ता. शाहूवाडी) परिसरात गेल्या महिनाभरापासून बिबट्याची दहशत कायम असून, आता तर चक्क भरदुपारी दोन बिबट्यांचे दर्शन झाल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी (दि.१० जानेवारी) दुपारी दीडच्या सुमारास अंबेश्वर हायस्कूल आणि प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात ही जोडी वावरताना आढळली.दिवसाढवळ्या झालेल्या या दर्शनाने ग्रामस्थ आणि पर्यटकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.

शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आरोग्य केंद्र आणि हायस्कूलच्या परिसरात दोन बिबटे सावजाच्या शोधात वावरत होते. मात्र, मानवी चाहूल लागताच या बिबट्यांनी आपला मोर्चा आंबा घाटाकडील दाट जंगलाच्या दिशेने वळवला आणि तेथून धूम ठोकली. यापूर्वी या भागात एकाच बिबट्याचा वावर होता, मात्र आता जोडीने बिबटे फिरू लागल्याने परिसरातील धोका अधिक वाढला आहे.
​गेल्या महिनाभरापासून आंबा आणि मानोली परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. यापूर्वी केवळ एक बिबट्या अधूनमधून दिसत होता, मात्र आता चक्क जोडीने वावर सुरू झाल्याने ग्रामस्थांची झोप उडाली आहे. शेतकरी पिकांच्या संरक्षणासाठी रात्रीच्या वेळी जीव मुठीत धरून शेतात जात आहेत. आंबा हे पर्यटन स्थळ असल्याने येथे पर्यटकांची मोठी वर्दळ असते, बिबट्यांच्या दर्शनाने पर्यटनावरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button