
अजितदादांना उद्या अखेरचा निरोप!
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धगधगते पर्व आज एका भीषण विमान अपघाताने शांत झाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सर्वांचे लाडके ‘अजितदादा’ यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र आज शोकसागरात बुडाला आहे.आपल्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीसाठी ओळखले जाणारे अजित पवार आज सकाळी बारामती येथे निवडणूक प्रचारासाठी येत असताना त्यांच्या विमानाला अपघात झाला. या घटनेनंतर बारामतीसह संपूर्ण राज्यातून जनसागर आपल्या लाडक्या नेत्याच्या अंतिम दर्शनासाठी बारामतीकडे झेपावत आहे.
पवार कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
अजित पवारांच्या निधनाचे वृत्त समजताच दिल्लीत असलेल्या खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार तातडीने बारामतीकडे रवाना झाल्या. सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर ‘Devastated’ (उद्धवस्त) असा शब्द लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्वतः अपघातस्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. बारामती शासकीय रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली असून, सर्वत्र ‘दादा’ आठवणीने कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले आहेत.
अंत्यदर्शन आणि अंत्यविधीचा कार्यक्रम
कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आणि अजितदादांची लोकप्रियता लक्षात घेता, प्रशासनाने आणि पवार कुटुंबाने पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यदर्शनासाठी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विद्या प्रतिष्ठानचे ट्रस्टी किरण गुजर यांनी दिलेल्या माहितीनुसार अंत्यसंस्काराचे नियोजन खालीलप्रमाणे असेल.
आज (बुधवार, २८ जानेवारी): दुपारी ४:०० वाजेपासून रात्री उशिरापर्यंत अजित पवार यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठान, विद्यानगरी चौक येथील मैदानात नागरिकांच्या अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल.
उद्या (गुरुवार, २९ जानेवारी) सकाळी ९:०० वाजता : गदिमा सभागृहापासून दादांची अंत्ययात्रा निघेल.
अंत्ययात्रा मार्ग : गदिमा सभागृह – विद्यानगरी चौक – भिगवण रोड सेवा रस्ता – विद्या प्रतिष्ठानचा अंतर्गत रस्ता – मराठी शाळेचे गेट – विद्या प्रतिष्ठान मैदान.
अंतिम निरोप: उद्या सकाळी ११:०० वाजता विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात पूर्ण शासकीय इतमामात (State Honours) त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
पंतप्रधान मोदी आणि अमित शाह येणार?
अजित पवारांच्या निधनामुळे देशाच्या राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांना अखेरची श्रद्धांजली वाहण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या विशेष विमानाने बारामतीत दाखल होणार आहेत. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अनेक राष्ट्रीय स्तरावरील नेते उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
राज्यात ३ दिवसांचा शासकीय दुखवटा
महाराष्ट्र सरकारने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सन्मानार्थ २८ ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. या काळात राज्यातील सर्व शासकीय इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवले जातील आणि कोणतेही मनोरंजन किंवा अधिकृत कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत.




