
मोठी बातमी! मुंबई महापालिकेसाठी भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर; ‘या’ नऊ जणांना मिळाली संधी
मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप शिवसेना शिंदे यांच्यात जागावाटपात मोठी रस्सीखेच होताना दिसत आहे. २२७ प्रभागांची रचना असलेल्या आशिया खंडातील सर्वात श्रीमंत समजल्या जाणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपकडून १२७ उमेदवारांना रिंगणात उतरवण्यात येणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.२० जागांवरील भाजप आणि शिवसेना शिंदे यांच्यात संघर्ष असून, लवकरच निर्णय अंतिम करण्यात येणार आहे. या सगळ्या घडामोडीत भाजपने शेवटच्या क्षणी अवघ्या दोन दिवसांचा अवधी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी असताना मुंबई महापालिका निवडणुकीतील उमेदवारांच्या नावाची पहिली यादी जाहीर केली आहे.
या उमेदवार यादीत ९ जणांचा समावेश असून, भाजपकडून युवा मोर्चा अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांना मुंबईतील वॉर्ड क्रमांक 47 मधून उमेदवारी देण्यात आली आहे. माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी यांना वॉर्ड क्रमांक 9 मधून, माजी नगरसेवक जितेंद्र पटेल यांना वॉर्ड क्रमांक 10 मधून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांनी देखील उमेदवारी देण्यात आली असून वॉर्ड क्रमांक १०७ मधून ते निवडणुकीच्या रिंगणात भाजपकडून असतील.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांना देखील मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणांगणात उतरविण्यात आले आहे. त्यांना मानखुर्द शिवाजीनगरच्या प्रभाग क्रमांक 135 मधून भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व उमेदवार आजच आपला उमेदवारी अर्ज भरतील, अशी माहिती आहे.
ठाकरेंची साथ सोडत भाजपमध्ये गेलेल्या दिवंगत माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांना देखील भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांची उमेदवारी जवळपास निश्चितच मानली जात होती. महापालिकेच्या निवडणुकीच्या घोषणेनंतर तेजस्वी घोसाळकर यांनी प्रचार दौऱ्याला सुरूवात केली. त्यांची फक्त अधिकृत नावाची घोषणा होणे बाकी होते.
रविवारी रात्रीपासून दादर येथील वसंतस्मृती कार्यालयातून भाजप उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप सुरु झाले आहे. भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रेसमध्ये अनेक कार्यकर्ते होते, त्यांची मनधरणी करण्याचे आव्हान भाजपपुढे असणार आहे. त्यांची मनधरणी करण्याची जबाबदारी आमदारांवर सोपवण्यात आल्याची माहिती आहे.
उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे :
नील सोमय्या- वॉर्ड क्रमांक 107
तेजिंदर सिंग तिवाना- वॉर्ड क्रमांक 47
नवनाथ बन- वॉर्ड क्रमांक 135
शिवानंद शेट्टी- वॉर्ड क्रमांक 9
संतोष ढाले- वॉर्ड क्रमांक 215
स्नेहल तेंडुलकर- वॉर्ड क्रमांक 218
अजय पाटील- वॉर्ड क्रमांक 214
सन्नी सानप- वॉर्ड क्रमांक 219
तेजस्वी घोसाळकर- वॉर्ड क्रमांक 2




