
पर्यटकांच्या गर्दीने सिंधुदुर्ग गजबजला; मात्र पायाभूत सोयीसुविधांचा अभाव!
हिवाळी सुट्टीचा हंगाम सुरू होताच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्गरम्य पर्यटनस्थळे आणि समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून गेले आहेत. मालवण, तारकर्ली, वेंगुर्ले, शिरोडा वेळागर, देवगड आणि कुणकेश्वर यांसारख्या भागांत गोवा, कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्रातून पर्यटकांचा ओघ वाढल्याने हॉटेल आणि लॉजिंग व्यवसाय तेजीत आहेत. मात्र, एकीकडे पर्यटनाचा आलेख उंचावत असताना, दुसरीकडे मूलभूत सुविधांच्या अभावामुळे पर्यटकांसह स्थानिकांचेही प्रचंड हाल होत आहेत.
देवगड-जामसांडे शहरात सध्या पाणीपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने भीषण टंचाई निर्माण झाली आहे. पर्यटकांची सोय करण्यासाठी स्थानिक नागरिक आणि व्यापारी बांधवांना १००० लिटर पाण्यासाठी तब्बल ४०० रुपये मोजून विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. सुट्ट्यांमुळे घरी आलेल्या पाहुण्यांची आणि पर्यटकांची तहान भागवताना स्थानिकांची मोठी ओढाताण होत असून, नगरपंचायत प्रशासनाचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.
मूलभूत सुविधांचा वानवा :
निसर्गसंपन्न देवगड शहर पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असले, तरी येथे आवश्यक सोयीसुविधांची मोठी कमतरता आहे.सार्वजनिक ठिकाणी सुलभ प्रसाधनगृहे आणि शौचालये पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. समुद्रस्नानानंतर कपडे बदलण्यासाठी किंवा गोड्या पाण्याने अंघोळ करण्यासाठी किनाऱ्यांवर कोणतीही अद्ययावत व्यवस्था नाही. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
पर्यटन धोक्यात येण्याची शक्यता
सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो, मात्र समस्यांमुळे भविष्यात पर्यटनावर गदा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जर वेळीच अद्ययावत स्वच्छतागृहे, स्नानगृहे आणि मुबलक पाणीसाठा उपलब्ध करून दिला नाही, तर पर्यटकांची पावले या परिसराकडे वळणे बंद होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन पाणीप्रश्न आणि पर्यटनाच्या पायाभूत सुविधा तातडीने मार्गी लावाव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.




