
खेड बसस्थानकातून चोरी होण्याचा दुसरा प्रकार, महिलेचे पावणेचार लाखांचे दागिने चोरट्याने केले लंपास…
खेड येथील बसस्थानकातून ६ दिवसांपूर्वीच खेड-मंडणगड एसटीमध्ये चढणार्या महिलेचे पावणेतीन लाखांचे दागिने लंपास केल्याची घटना ताजी असतानाच आणखी एका महिलेच्या सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्याने डल्ला मारत ३ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. अवघ्या ६ दिवसात घडलेल्या दुसर्या घटनेने खळबळ उडाली असून महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
येथील तक्रारदार महिला येथील बसस्थानकातून एसटीमध्ये चढत असताना चोरट्याने बॅगेची चेन उघडून आतमध्ये ठेवलेल्या २ लाख रुपये किंमतीच्या दोन सोन्याच्या बांगड्या, १ लाख ८० हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन आणि ५ हजार २०० रुपयांची रोकड लांबवली. पर्समधील दागिने लंपास झाल्याचे लक्षात येताच महिलेला धक्काच बसला. तिने पोलीस ठाणे गाठून रितसर तक्रार नोंदवली. त्यानुसार गुरुवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.www.konkantoday.com




