
स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी मोठी संधी! एमपीएससीकडून नवी जाहिरात.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित, गट-अ आणि गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यभरातील ३८ जिल्हा केंद्रांवर ३१ मे रोजी परीक्षा घेतली जाणार असून, या परीक्षेसाठी उमेदवारांना ३१ डिसेंबर ते २० जानेवारी या कालावधीत अर्ज करता येणार आहे.एमपीएससीने या बाबतची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. या पदभरतीच्या माध्यमातून सामान्य प्रशासन विभाग, महसूल आणि वन विभागातील एकूण एकूण ८७ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्यात उप मुख्य कार्यकारी अधिकारी/ गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी) गट-अ पदाच्या १३ जागा, सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-अ पदाच्या ३२ जागा, सहायक गट विकास अधिकारी गट-ब पदाच्या ३० जागा, उद्योग अधिकारी (तांत्रिक) गट-ब पदाच्या ४ जागा आणि पशुवैद्यकीय अधिकारी गट-अ पदाच्या ८ जागांचा समावेश आहे. तर उपजिल्हाधिकारी गट अ या संवर्गासाठी शासनाकडून मागणीपत्र प्राप्त झालेले नाही. उमेदवारांना ३१ डिसेंबरपासून अर्ज भरता येणार आहे. तर चलनाद्वारे ऑफलाइन शुल्क २३ जानेवारीपर्यंत भरता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. उमेदवारांची वयोमर्यादा, पदनिहाय पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अन्य नियम आदी तपशील जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आला आहे.
भरती प्रक्रिया पूर्व परीक्षा, लेखी मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांत राबवली जाणार आहे. पूर्व परीक्षेचे गुण केवळ मुख्य परीक्षेसाठी पात्रता निश्चित करण्यासाठी वापरले जातील. अंतिम निकालात त्या गुणांचा समावेश नसेल. पूर्व परीक्षेतील निकालाच्या आधारे संबंधित सेवेच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी स्वतंत्रपणे मुख्य परीक्षा घेण्यात येईल. संबंधित सेवानिहाय मुख्य परीक्षेचा दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. पदसंख्या आणि आरक्षण, संवर्गामध्ये शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे.




