
राजापुरात गोवा बनावटीची दारू जप्त
राजापूर : राजापुरात गोवा बनवाटीच्या दारूची छुप्या पद्धतीने होत असलेली वाहतूक व विक्री चर्चेत असतानाच आज (२८ डिसेंबर) राजापूर पोलीसांनी कारवाई करत शहरातील बौद्धवाडी येथे एका चारचाकी गाडीसह १ लाख १५ हजार ९२० रुपये किंमतीचे गोवा बनवाटीची दारू भरलेले ६७ बॉक्स जप्त केले आहेत.
या प्रकरणी राजापूर पोलीसांनी रोहित अंबाजी इंगळे (रा. राजापूर बंगलवाडी) या एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती राजापूर पोलिसांनी दिली.
३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राजापूर पोलिसांनी ही धडक कारवाई केल्याने पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे स्वागत होत आहे. यापूर्वी अनेकवेळा कारवाई करूनही हे प्रकार राजरोसपणे सुरूच आहेत. राजापूर एसटी डेपो समोरही यापूर्वी पोलिसांनी अशाप्रकारे गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणारे टेम्पो ताब्यात घेत कारवाई केली होती.
रविवारी अशाच प्रकारे राजापूर शहरातील बौद्धवाडी भागात गोवा बनावटीची दारूचे बॉक्स भरलेली कार उभी असल्याची गोपनीय माहिती राजापूर पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे, दीपज्योती पाटील यांसह पोलीस कर्मचारी अनिल केसकर, प्रथमेश वारिक, डिगंबर शेलार, पोलीस वाहन चालक हर्षद मुल्ला यांच्या पथकाने आज दुपारी १ वाजता ही धडक कारवाई केली.
या कारवाईत पोलीसांनी सुमारे १ लाख १५ हजार ९२० रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारू असलेले ६७ बॉक्स, तसेच सुमारे पाच लाख रुपये क्रेटा कार (क्र. एमएच ०५ इऐ ०६६१) असा एकूण ६ लाख १५ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
या प्रकरणी राजापूर पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर २५२/२०२५ महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(अ)(इ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.




