
रत्नागिरी जिल्हा पोलिसांकडून १८१ किलो १४१ ग्रॅम १०५ मिलिग्रॅम अंमली पदार्थांचा साठा नष्ट!

रत्नागिरी जिल्हा पोलीस प्रशासनाने अंमली पदार्थविरोधात मोठी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या कारवाई दरम्यान सापडलेले १८१ किलो १४१ ग्रॅम १०५ मिलिग्रॅम अंमली पदार्थांचा साठा नष्ट करुन अमली पदार्थ तस्करांचे कंबरडे मोडले आहे. या कारवाईत एन.डी.पी.एस. कायदा, १९८५ अंतर्गत जप्त करण्यात आलेल्या विविध अंमली पदार्थांचा रांजणगाव (पुणे) येथील अधिकृत प्रकल्पात नाश करण्यात आला.
पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी एन.डी.पी.एस. कायद्यान्वये दाखल गुन्ह्यांतील जप्त मुद्देमालाचा तातडीने नाश करण्याचे निर्देश दिल्यानंतर, त्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यात ड्रग्ज डिस्पोजल समिती स्थापन करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे असून, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी आणि पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) श्रीमती राधिका फडके हे सदस्य आहेत. या समितीच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रत्नागिरी श्री. नितीन ढेरे यांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार सन २०२० ते २०२५ या कालावधीत एन.डी.पी.एस. कायद्यान्वये दाखल ६५ गुन्ह्यांतील जप्त मुद्देमाल नाशासाठी न्यायालयाकडून आदेश प्राप्त करून घेण्यात आले. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे आवश्यक परवानगीसाठी अर्ज करण्यात आला होता.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मंजुरी मिळाल्यानंतर महाराष्ट्र एनविरो पॉवर लिमिटेड, एमआयडीसी रांजणगाव (पुणे) येथे जाळण्याच्या पद्धतीने मुद्देमाल नष्ट करण्याची प्रक्रिया निश्चित करण्यात आली. त्यानुसार २६ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गांजा (८२ किलो ९८१ ग्रॅम ७५ मिलिग्रॅम), चरस (९७ किलो ८९९ ग्रॅम), ब्राऊन हेरॉइन (२५२ ग्रॅम ३० मिलिग्रॅम) आणि एम.डी. (९ ग्रॅम) असा एकूण १८१ किलो १४१ ग्रॅम १०५ मिलिग्रॅम अंमली पदार्थांचा सुरक्षितपणे नाश करण्यात आला




