
पुढच्या 24 तासांत कडाक्याची थंडी घराबाहेर पडणं करणार कठीण
उत्तर भारतातली बहुतांश राज्यांमध्ये थंडीनं जम बसवला असून, दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानात थंडीचा कडाका वाढताना दिसत आहे. केंद्रीय हवामानशास्त्र विभागानं उत्तर भारतातील बहुतांश क्षेत्रांमध्ये दाट धुक्याचा यलो अलर्ट जारी केला आहे.दृश्यमानतेवर हे धुकं परिणाम करताना दिसणार असून, 28 डिसेंबरपर्यंत थंडी आणि धुक्याची ही लाट ओसरणार नसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या लाटेचा परिणाम मध्य आणि दक्षिण भारतापर्यंत दिसणार असून, पूर्वोत्तर भारतातसुद्धा तापमानानं नीचांक गाठल्याचं वृत्त आहे. दरम्यानच्या काळात नव्यानं पर्वतीय क्षेत्रांवर सक्रीय होत असणाऱ्या पश्चिमी झंझावातामुळं पावसाचाही अंदाज आहे. ज्यामुळं थंडीचा कडाका आणखी वाढू शकतो.
महाराष्ट्रात पुढील 24 तासांमध्ये…
महाराष्ट्रात सध्या थंडीची लाट सक्रीय नसली तरीही उत्तरेकडून येणारे थंड वारे राज्यातील तापमानात घट आणत असून त्यामुळं गारठा अती तीव्र होताना दिसत आहे. येत्या 24 तासांत तापमानात आणखी घट अपेक्षित असून आठवडा अखेरीसही थंडीच सरशी करताना दिसणार आहे. प्रामुख्यानं उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीचा कडाका अधिक असेल. तर, उर्वरित राज्यात किमान आणि कमात तापमानात चढ-ऊतार होताना दिसतील. काही भागांमध्ये थंडीचा कडाका इतका अधिक असेल की घराबाहेर पडणंही कठीण होऊन बसणार आहे. मुंबई- नवी मुंबई आणि उपनगरंही या गारठ्यास अपवाद नसून, सध्या या भागांमध्येही पहाटे आणि सायंकाळी गारठा वाढत आहे




